‘तो’ व्हायरल व्हिडिओ खेड-शिवापूर येथे जप्त केलेल्या नोटांचा नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका गाडीतून सुमारे पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर ढीगभर नोटांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, खेड शिवापूर भागातून जप्त करण्यात आलेल्या नोटांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विरोध पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी आणलेली ही रक्कम असल्याचा आरोप केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ किमान तीन वर्षे जुना आहे. खेड-शिवापूर येथे झालेल्या कारवाईशी या व्हिडिओचा संबंध नाही.

काय आहे दावा?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप-अजित पवार-शिंदे गटाच्या महायुती सरकारवर निशाणा साधत हा व्हिडिओ खेड-शिवापूर येथे जप्त करण्यात आलेल्या नोटांचा म्हणून शेअर केला.

मूळ पोस्ट – ट्विटर

तथ्य पडताळणी

व्हिडिओच्या कीफ्रेमला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 2021 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

युट्यूबवर युनिक मल्टी अॅडव्हर्टिज्मेंट नामक युट्यूब चॅनेलवर 11 सप्टेंबर 2021 रोजी हाच व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

म्हणजेच हा व्हिडिओ किमान तीन वर्षे जुना आहे. खेड-शिवापूर येथून 21 ऑक्टोबर 2024 रोजी नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा व्हिडिओ या कारवाईचा नाही हे स्पष्ट होते.

पाच कोट जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. लोकसत्तेच्या बातमीनुसार, मुंबई-बंगळुरू मार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरातून एका गाडीत मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

21 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले. रोकड कुठे नेण्यात येणार होती, तसेच कोणाची आहे, याबाबतची माहिती चौकशीत न मिळाल्याने पोलिसांनी रोकड जप्त केली. राजगड पोलीस ठाण्यात रोकड नेण्यात आली.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, तीन वर्षे जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ खेड-शिवापूर परिसरात जप्त करण्यात आलेल्या रकमेचा नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट सेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘तो’ व्हायरल व्हिडिओ खेड-शिवापूर येथे जप्त केलेल्या नोटांचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False