FAKE NEWS: बिर्याणीतून नपुंसकतेच्या गोळ्या देण्याची खोटी पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

बिर्याणी विक्रेता आणि औषधगोळ्यांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, कोईम्बतूर शहरातमध्ये एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक बनवणाऱ्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही फेक न्यूज आहे.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये आर. डी. सिंग नामक एका व्यक्तीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट आहे. त्यात बिर्याणी वाटणारा, बिर्याणीचे भांडे आणि औषधगोळ्यांचे मिळून चार फोटो दिलेले आहेत. सोबत लिहिले की, “हिंदुंसाठी वेगळी आणि मुस्लिमांसाठी वेगळी बिर्याणी तयार करण्यात येते. हिंदुच्या बिर्याणीत नपुंसक बनवणाऱ्या गोळ्या टाकण्यात येतात. कोईम्बतूनमधील माशाल्लाह रेहमान बिस्माल्लाह हॉटेलमध्ये असा प्रकार आढळून आला. अशा लोकांपासून सावधान राहा!”

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही शोधले की, कोईम्बतूरमध्ये अशी काही घटना घडली का. त्यानुसार, न्यूज-18 वेबसाईटने 2 मार्च 2020 रोजीची बातमी आढळळी. 

आर. डी. सिंग नामक युजरने सदरील ट्विट केल्यानंतर कोईम्बतूर पोलिसांना ही फेक न्यूज असल्याचे स्पष्ट केले होते. कोईम्बतूर शहरात अशी कोणतीही घटना उघडकीस आली नसल्याचे पोलिसांनी ट्विटरद्वारे कळविले.

यानंतर आर. डी. शर्मा याने हे ट्विट डिलीट केले होते. परंतु, त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

एका युजरने सदरील व्हायरल फोटो व दावा शेअर केल्यानंतर कोईम्बतूर पोलिसांनी त्याला उत्तर देताना म्हटले होते की, फेक न्यूज पसरवू नका. सोशल मीडियाचा जबाबदारपणे वापर करा. कोणीही या ट्विट अकाउंटवर (आर. डी. सिंग) विश्वास ठेवू नये. फेक न्यूज पसरविणाऱ्या या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत.

मूळ ट्विट – ट्विटरअर्काइव्ह

हे तर स्पष्ट झाले की, कोईम्बतूर शहरातमध्ये बिर्याणीत नपुंसकतेच्या गोळ्या टाकण्याची घटना घडली नाही. आता व्हायरल पोस्टमधील फोटोंचे एक-एक करीत सत्य जाणून घेऊया.

फोटो क्र. 1

बिर्याणीचे वाटप करणाऱ्या या व्यक्तीचा फोटो युट्युबवरील एका व्हिडिओतून घेण्यात आला आहे. ‘इंडियन रेस्ट्राँ स्टाईल रेसेपी’ नामक युट्युब अकाउंटवर 1 जून 2016 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओचा हा थम्बनेल फोटो आहे. 

फोटो क्र. 2

बिर्याणीच्या भांड्याचा हा फोटोसुद्धा एका व्हिडिओतून घेतलेला आहे. 2017 साली एका ट्विटर युजरने सदरील व्हिडिओ शेअर करताना म्हटले होते की, हा व्हिडिओ भारतातील आहे. अधिक शोध घेतल्यावर कळाले की, हा व्हिडिओ चेन्नईमधील ‘एस. एस. हैदराबाद बिर्याणी’ नामक हॉटेलचा आहे. 

https://twitter.com/shoprest17/status/839929323364704257

अर्काइव्ह

फोटो क्र. 3 व 4

ओषधीगोळ्यांचे हे दोन्ही फोटो भारतातील नाहीत. श्रीलंकेतील डेली मिरर वेबसाईने 2019 मध्ये दिलेल्या बातमीनुसार, कोलोंबो शहरात एका घरामध्यो पोलिसांनी छापा टाकून औषधगोळ्यांचा अवैध साठा जप्त केला होता. वडील-मुलाच्या जोडगळीकडे सुमारे 40 लाख रुपये किंमतीच्या गोळ्या सापडल्या होता.

मूळ वेबसाईट –  डेली मिरर 

निष्कर्ष

वरील सर्व पुराव्यांवरून सिद्ध होते की, व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येणारा दावा खोटा आहे. कोईम्बतूर शहरामध्ये नपुंसकतेच्या गोळ्या घालून बिर्याणी दिल्याची घटना घडलेली नसून, जुने आणि एकमेकांशी संबंध नसलेले फोटो एकत्र करून धार्मिकद्वेष व भीती पसरविली जात आहे. अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका.

तुमच्याकडेदेखील अशा खोट्या व भ्रामक पोस्ट आल्या असतील तर पडताळणीसाठी आमच्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवा.

Avatar

Title:बिर्याणीतून नपुंसकतेच्या गोळ्या देण्याची खोटी पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False