चित्रा वाघ यांचा संजय राठोडसोबतचा फेक फोटो व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचा एक कथित फोटो सध्या व्हायरल होत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि संजय राठोड यांचा हातात हात घेतलेला एक कथित फोटो शेअर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो फोटोशॉप केलेला आहे.

काय आहे दावा? 

सोशल मीडियावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांचा हातात हात घेतलेला खालील फोटो व्हायरल होत आहे. त्यावर “चित्रा वाघ आता आम्ही काय समाजयचं” असे लिहिलेले आहे. चित्रा वाघ यांच्याविरोधात या फोटोचा वापर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

या फोटोची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यानुसार कळाले की, हा फोटो डिजीटली एडिट करून तयार केलेला आहे. 

चित्रा वाघ यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर 16 एप्रिल 2020 रोजी त्यांचे पती किशोर वाघ यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटो अल्बममध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या व्हायरल फोटोचा मूळ फोटोदेखील आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुक 

चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांच्या फोटोला खोडसाळपणे एडिट करून किशोर यांच्या जागी संजय राठोड यांचा चेहरा लावण्यात आलेला आहे.

मूळ फोटो आणि व्हायरल फोटो यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच दिसतो.

चित्रा वाघ यांचा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांनी ट्विटरवर मूळ फोटो शेअर करून नाराजी व्यक्ती केली की, “महाराष्ट्रात अन्यायाविरूद्ध आवाज उठवणं गुन्हा आहे का?”

तसेच, असे फेक फोटो शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे. चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा फोटो खोडसाळपणे एडिट करून संजय राठोड यांचा फोटो लावण्यात आला आहे.

Avatar

Title:चित्रा वाघ यांचा संजय राठोडसोबतचा फेक फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False