बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

False राजकीय | Political

बिहारमध्ये नुकतेच झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपवर निवडणूक प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करणारी ही मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. एक तर हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील आहे. तसेच आरोप करणारी ही मुलगी तेथे पोटनिवडणुकीत उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारीची मुलगी आहे. ती निवडणूक अधिकारी नाही.

काय आहे दावा?

सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक मुलगी मीडिया प्रतिनिधींसमोर मतमोजणी केंद्रात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत आहे. “टॅगवर स्वाक्षरी नाही, ना स्लिप जुळत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच केंद्रावरील पोलिससुद्धा मोबाईलची तपासणी करीत नव्हते. लोक सर्रास मोबाईल घेऊत आत जात होते,” असा आरोप ती मुलगी करते.

कॅप्शनमध्ये लोकांनी म्हटले की, “बिहार इलेक्शनमध्ये झालेला घोटाळा स्वत: इलेक्शन कर्मचारी मीडियासमोर चव्हाट्यावर मांडत आहे. अजून काय पुरावा पाहिजे यांच्या दळभद्रीपणाचा. ”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

हाच व्हिडिओ काही लोकांनी मध्य प्रदेशमधील पोट निवडणूकीत घोटाळा उघड करणारी निवडणूक कर्मचारी म्हणूनही फेसबुकवर शेयर केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ही मुलगी कोण आहे हे शोधणे गरजेजे आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडूण रिव्हर्स इमेज सर्च आणि की-वर्ड्सद्वारे शोधले असता मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हा व्हिडिओ शेयर करण्यात आल्याचे आढळले.

10 नोव्हेंबर रोजीच्या या ट्विटनुसार इंदुरच्या सांवेर (मध्य प्रदेश) येथील हा व्हिडिओ आहे. परंतु, या व्हिडिओतील मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचे या ट्विटमध्ये म्हटलेले नाही. ती जर खरोखरंच निवडणूक अधिकारी असती तर मध्य प्रदेश काँग्रेसने तसे नक्कीच लिहिले असते. परंतु, तसे काहीच न आढळल्यामुळे या व्हिडिओसोबत केल्या जाणाऱ्या दाव्याच्या सत्यतेविषयी संशय बळावतो.

अर्काइव्ह

व्हिडिओमध्ये ANI वृत्तसंस्थेचा माईक दिसतो. तसेच या घटनेचे ठिकाणही माहिती झालेले आहे. त्यानुसार माहिती घेतला असता ANI वृत्तसंस्थेने 10 नोव्हेंबर दिलेली एक बातमी आढळली. मतमोजणी केंद्रात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप कांग्रेस समर्थकांनी केल्यामुळे मतमोजणी एका तासासाठी थांबविण्यात आली होती. सांवेर येथील काँग्रेसचे उमेदवार प्रेमचंद गुड्डू यांचा मुलगा अजित बौरासी यांनी आरोप केला होता की, अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करीत आहेत.

बातमीत पुढे गुड्डू यांची मुलगी रश्मी बौरासी यांचासुद्धा उल्लेख आहे. वरील व्हायरल व्हिडियोमध्ये करण्यात आलेले आरोप आणि ANI च्या बातमीत रश्मी बोरसाई यांनी केलेले आरोप यात बरेच साम्य आहे. 

मूळ बातमी – ANI | अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने (हिंदी) अजित बौरासी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, या व्हिडिओमध्ये आरोप करणारी ती मुलगी त्यांची बहिण रश्मी बौरासी आहे. रश्मी या प्रेमचंद गुड्डू यांच्या कन्या आहेत. 

“सांवेर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवेळी माझी बहिण रश्मी काँग्रेस पक्षाची एजेंट म्हणून केंद्रावर उपस्थित होती. ती सरकारी अधिकारी नव्हती. केवळ माझ्या वडिलांची प्रतिनिधी म्हणून गेली होती. तेथील गैरप्रकाराबद्दल तिने आक्षेप घेतला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे”, असे अझित बौरासी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानंतर मतमोजणी काळाकरीत थांबविण्यात आली तरी नंतर ती पुन्हा रुजू करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपच्या तुलसी सिलावट यांनी प्रेमचंद गुड्डू यांचा पराभव केला. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ बिहारमधील नाही. तो मध्य प्रदेशमधील आहे. तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ती मुलगी निवडणूक अधिकारी नाही. ती काँग्रेसच्या उमेदवाराची मुलगी आहे. पक्ष कार्यकर्त्यांने आरोप करणे आणि निवडणूक अधिकाऱ्याने आरोप करणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे सदरील दावा असत्य सिद्ध होतो. 

Avatar

Title:बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False