
शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली असून या योजनेनुसार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार असल्याची माहिती समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी खरोखरच अशी काही योजना आणली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी अनेक संकेतस्थळांनी याबाबतचे वृत्त (संग्रहित) दिले असल्याचे दिसून आले. त्यानंतर agrowonegram ने दिलेले 12 ऑगस्ट 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे आणि शेतकऱ्यांनी अशा स्वरूपाच्या सोशल मिडीयावर आढळणाऱ्या फेक बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालकांनी केले असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर पत्र सुचना कार्यालयाने 15 ऑगस्ट 2020 रोजी केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्येही केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निष्कर्ष
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आहे. त्यामुळे या नावाने व्हायरल होणारे संदेश हे असत्य आहेत.

Title:केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची योजना आणली आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
