केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच तेथे सभा घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजपच्या झेंड्याच्या मानवी प्रतिकृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला. दावा केला जात आहे की, योगी आदित्यनाथ यांचे केरळमध्ये असे स्वागत करण्यात आले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा जुना फोटो असून, त्यासोबत चुकीचा दावा केला जात आहे.

काय आहे दावा?

हजारो कार्यकर्त्यांनी भाजपच्या झेंड्यातील रंगांची वेशभूषा करून मानवी झेंडाचा आकार घेतल्याचा फोटो शेअर करून कॅप्शमध्ये म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट महाराज योगीं जी केरळमध्ये”. एका युजरने हाच फोटो शेअर करीत म्हटले की, आजचा सर्वोत्तम फोटो. योगींचे केरळमध्ये भव्य स्वागत.

मूळ फोटो – फेसबुक

तथ्य पडताळणी

हा फोटो खरंच केरळमधील आहे का याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, हा फोटो गुजरातमधील आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या 2015 मधील एका बातमीत हा फोटो आढळला. बातमीनुसार, भाजपच्या 35 व्या स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिल 2015 रोजी गुजरातमधील दाहोड येथील एका कॉलेजमध्ये सुमारे 25 हजार जणांनी हा मानवी झेंडा तयार केला होता.

मूळ फोटो – इंडियन एक्सप्रेस

या कार्यक्रमाला गुजराच्या तत्कालिन मुख्यमंत्री आनंदी पटेल उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी पंचनिष्ठा प्रतिज्ञा घेतली होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, 2015 चा जुना फोटो केरळमध्ये योगी आदित्यनाथांचे स्वागत म्हणून शेअर केला जात आहे.

Avatar

Title:केरळमध्ये योगी आदित्यानाथ यांच्यासाठी हा मानवी झेंडा तयार करण्यात आला नव्हता; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False