140 ने सुरू होणाऱ्या नंबरचा कॉल न उचलण्याचे कारण काय? जाणून घ्या सत्य

सामाजिक

सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, 140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आल्यास तो उचलू नये. व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, आत्ताच मेन कंट्रोल एक संदेश प्रसारित केलेला आहे की ज्या मोबाईल नंबरची सुरुवात 104 होते, तो फोन उचलायचा नाही, असे संदेश प्राप्त झालेला आहे आपल्या मित्रमंडळींना ते त्वरित कळवावे

फॅक्ट क्रेसेंडोने या बाबत पडताळणी करून या मेसजचे कारण शोधून काढले.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

व्हॉट्सअपवरदेखील या मेसेजविषयी फॅक्ट क्रेसेंडोकडे विचारणा करण्यात आली.

काय आहे हे प्रकरण?

सकाळपासून सोशल मीडियावर एका अनोळखी क्रमांकावरून विचित्र कॉल येत असल्याची तक्रार केली जात आहे. 140 नंबरने सुरू होणाऱ्या विविध क्रमांकावरून हे कॉल येत आहेत. तो उचलल्यावर एक व्यक्ती घाबरलेल्या आवाजात सांगतो की, त्याने एक खून होताना पाहिला. असा विचित्र आणि भीतीदायक कॉल आल्यामुळे अनेक त्रस्त झाले. 

मुंबई पोलिसांना टॅग करीत अनेकांनी ट्विटरवर याबाबत तक्रार केली. एका युजरने लिहिले की, +91-140-880-0135 या क्रमांकावरून एक फोन आला. त्यात एक जण म्हणाला की, त्याने खून होताना पाहिला व तो त्याने फोनवर रेकॉर्ड केला. आता ते लोक त्याच्यामागे लागले आहेत व फोन कट झाला.

अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने माहिती दिली की, हे कॉल ‘सोनी लिव’ नावाच्या चॅनेलने चालविलेल्या जाहिरात मोहिमेचा एक भाग आहे. या चॅनेलवरील एका मालिकेच्या प्रोमोशनसाठी असे कॉल करण्यात आले होते. आम्ही त्यांना ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कृपया याविषयी अफवा पसरवून भीती घालू नये.

जाहिरात अंगलट आल्यानंतर ‘सोनी लिव’ने लोकांची माफी मागायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, ‘अनदेखी’ नावाच्या नव्या मालिकेच्या जाहिरातीचा भाग म्हणून हे कॉल करण्यात आले होते. तुम्हाला याचा त्रास झाल्याबद्दल आम्ही माफी मागतो. आपल्याला घाबरविण्याचा आमचा उद्देश नव्हता. माध्यमांनीदेखील याबाबत बातम्या दिल्या. 

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, एका चॅनेलच्या जाहिरातीमुळे हा सगळा घोटाळा झाला. मालिकेची जाहिरात करण्याच्या नादात लोकांची चांगलीच भांबेरी उडाली. परंतु, सायबर सेलने याची नोंद घेतली असून, कंपनीला असे कॉल थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Title:140 ने सुरू होणाऱ्या नंबरचा कॉल न उचलण्याचे कारण काय? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Explainer