FALSE VIDEO: ही कांचीपुरम मंदिरातील दर 40 वर्षांनी बाहेर काढली जाणारी विष्णू मूर्ती नाही

False सामाजिक

तमिळनाडू येथील कांचीपुरम शहरात प्रसिद्ध विष्णू मंदिर आहे. त्याचे नाव वरदराज पेरुमल मंदिर आहे. हिंदू धर्मामध्ये या मंदिराच अत्यंत मानाचे स्थान आहे. या मंदिरातील एक प्राचीन विष्णू मूर्ती दर चाळीस वर्षांनी साफसफाई आणि भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढली जाते. ही प्राचीन विष्णू मूर्ती बाहेर काढताना दाखवण्याचा दावा करणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुक पोस्टमध्ये सुमारे तीन मिनिटांचा एक व्हिडियो शेयर केलेला आहे. यामध्ये पुजारी खांद्यावर एक मूर्ती घेऊन पायऱ्या चढताना दिसतात. सोबत लिहिले की, कांचीपुरम येथील वरदराज विष्णूची ही ती मूर्ती आहे जी दर ४० वर्षांनी जमिनीतुन बाहेर काढतात. त्यानंतर ४० दिवस तेथे यात्रा भरते आणि नंतर पुन्हा ही मूर्ती जमीनीत पुरतात. ब्रम्हदेवाला नारायणांचे दर्शन घ्यायचे होते. म्हणून त्यांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा नारायण प्रसन्न होऊन त्यांनी अशा प्रकारची मूर्ती करण्यास सांगितली ती कांचीपुरम येथे हा उत्सव होतो. या वर्षी जुलै महिन्यात ही मूर्ती बाहेर काढणार आहे.

फेसबुकअर्काइव्ह

फेसबुक पोस्टमध्ये दिलेला व्हिडियो तुम्ही युट्यूबवर येथे आणि येथे पाहू शकता.

तथ्य पडताळणी

या पोस्टमध्ये दिलेल्या मजकूरावरून व्हिडियोतील मूर्तीबाबत केलेल्या दाव्याविषयी शंका निर्माण होते. कारण जर मूर्ती 40 वर्षांनी बाहेर काढली जात असेल आणि पोस्टमध्ये म्हटल्यानुसार या वर्षी जुलै महिन्यात ही मूर्ती बाहेर काढली जाणार असेल तर मग हा व्हिडियो एप्रिल महिन्यात आला कसा? चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1979 मध्ये यापूर्वी ही विष्णू मूर्ती बाहेर काढल्या गेली असेल. तेव्हा तर मोबाईलने असा व्हिडियो काढण्याची शक्यता नाही.

त्यामुळे कांचीपुरम येथील विष्णू मंदिरात 40 वर्षांनी कोणती मूर्ती बाहेर काढली जाते याची माहिती घेतली. टेंम्पल अ‍ॅडव्हायजर, अंतर्यामी, पीआर ट्रॅव्हलर ब्लॉग, इंडिया टेल्स यासह विविध संकेतस्थळावरील माहितीनुसार, कांचीपूरम येथील विष्णू मंदिरातील मुख्य मूर्तीला विविध आक्रमणांमध्ये क्षती पोहोचली. त्यामुळे ती मूर्ती मंदिराच्या एका हौदातील पाण्यात बुडविण्यात आली.

संदर्भ – अंतर्यामीटेंम्पल अ‍ॅडव्हायजरपीआर ट्रॅव्हलर ब्लॉगइंडिया टेल्स

आज या मंदिरात जी मूर्ती आहे ती कांचीपूरमपासून 20 किमी अंतरावरील पझाया शिवाराम येथून आणली होती. याच्या सन्मानार्थ पोंगल सणाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी (मातू पोंगल) कांचीपुरम विष्णू मंदिरातील “उत्सव मूर्ती”ची (मुख्य मूर्ती नाही!) मिरवणूक काढून ती पझाया शिवाराम येथे नेण्यात येते.

आता व्हिडियोत दिसणारी मूर्ती आणि मंदिरातील उत्सव मूर्ती यांची तुलना करून पाहू.

यावरून हे दिसून येते की, व्हिडियोत दिसणारी मूर्ती कांचीपुरम मंदिरातील उत्सव मूर्ती आहे. तसेच पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मूर्तीला जमिनीतून नाही तर पाण्यातून बाहेर काढतात आणि नंतर पुन्हा पाण्यातच बुडवून ठेवतात.

मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या अनंत सरस या हौदात बुडवलेल्या विष्णू मूर्तीला ‘अथि वरदार’ असे नाव आहे. ही मूर्ती शेवटची 1979 मध्ये पाण्याबाहेर काढण्यात आली होती. दर चाळीस वर्षांनी ती बाहेर काढली जाते. यंदा जुलै महिन्यात ती बाहेर काढली जाणार आहे. 1979 साली जेव्हा अथि वरदार मूर्ती बाहेर काढली होती, तेव्हाचा एक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे.

उत्तराधी मठ, कांचीपुरमच्या वेबसाईटनुसार यावर्षी 1 जुलै रोजी ही मूर्ती बाहेर काढली जाणार आहे. त्यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी कांचीपुरम येथे जमा होणार आहेत.

निष्कर्ष

कांचीपुरम येथील विष्णू मंदिरातील दर चाळीस वर्षांनी काढली जाणारी मूर्ती म्हणून पसरविला जाणारा व्हिडियो असत्य आहे. व्हिडियोमध्ये दिसणारी मूर्ती मंदिरातील उत्सव मूर्ती असून, दरवर्षी तिची मिरवणूक काढली जाते. यावर्षी जुलै महिन्यात मूळ विष्णू मूर्ती पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे.

Avatar

Title:FALSE VIDEO: ही कांचीपुरम मंदिरातील दर 40 वर्षांनी बाहेर काढली जाणारी विष्णू मूर्ती नाही

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False