कोरोना व्हायरसमुळे घरात कोंडून ठेवलेला माणूस आग लागली म्हणून बाहेर पडला का? वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय आरोग्य

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरातून पसरण्यास सुरू झालेल्या या विषाणुवर अद्यापही इलाज सापडलेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणीदेखील घोषित केली.

कोरोना व्हायरसबरोबरच त्याविषयी अनेक फेक न्यूजदेखील पसरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, घराला आग लागल्यानंतर कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी घरात डांबून ठेवलेला माणूस पाचव्यामजल्यावरून बाल्कनीतून उतरताना खाली पडला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोट ठरला.

काय आहे व्हिडियोमध्ये?

ट्विट केलेल्या व्हिडियोमध्ये पाचव्या मजल्यावरील एका घराला आग लागलेली आहे. एक व्यक्ती बाल्कनीतून बाहेर पडत असताना तो घसरून तिसऱ्या मजल्यावर पडतो. घराच्या खिडकीतून आगीचे लोट बाहेर पडताना दिसतात. या व्हिडियोबाबत अनेक लोक दावा करीत आहे, कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना आग लावून देण्यात येत आहे.

अर्काइव्ह

सत्य पडताळणी

हा व्हिडियो नेमका कुठला आणि याचा कोरोना व्हायरसशी काही संबंध आहे की, याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला. व्हिडियोतील की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केले असता विविध वेबसाईट्सवर हा व्हिडियो अपलोड केल्याचे आढळले.

चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट ‘वीबो’वर (Weibo) अनेक युजर दावा करीत होते की, घराला जंतुरहित करण्यासाठी अल्कोहोलचा वापर केल्यामुळे ही आग लागली. परंतु, या वृत्ताचे खंडन करणारी बातमी फॅक्ट क्रेसेंडोला आढळली. सिनो न्यूज वेबसाईटच्या बातमीनुसार, शांघाय अग्नशामक दलाने ही अफवा असल्याचे सांगितले. 

शांघायमधील प्रांतातील पुटाऊ जिल्ह्यातील ही घटना आहे. तेथील टाऊपु गाव क्र. 4 येथे एका इमारतीमध्ये 12 फेब्रुवारी रोजी सकाळी आग लागली होती. अग्नीशामक दलातील जवान त्वरित घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घरात अडकलेल्या 5 लोकांना वाचविण्यात यावेळी यश आले. आग लागण्याचे कारण शोधण्यात येत असून, अल्कोहोलचा जंतनाशक म्हणून उपयोग केल्यामुळे आग लागली नव्हती, असे शांघाय अग्नीशामक दलाच्या अधिकृत ‘विबो’  अकाउंटवरून 12 फेब्रुवारी रोजी सांगण्यात आले.

मूळ पोस्ट येथे पाहा – विबो

यानंतर 14 फेब्रुवारी रोजी शांघाय अग्नीशामक दलाने ‘विबो’द्वारे माहिती दिली की, टाऊपु गाव क्र. 4 मध्ये विरोल रोड 51 वरील गल्ली क्र.19 येथील इमारतीमधील 501 क्रमांकाच्या घरात वीज उपकरणामद्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली होती. यामध्ये घरातील अंतर्गत सजावट तसेच सामानाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मूळ पोस्ट येथे पाहा – विबो

चीनमधील वृत्तवाहिनी K-News यासंबंधी बातमीदिलेलील आहे. यामध्ये आग लागलेले घर दिसते तसेच, अग्नीशामक दलाचे जवान मदत करताना दिसतात. घटनास्थळी उपस्थित लोकांनी न्यूज चॅनेलला सांगितले की, आगीपासून वाचण्यासाठी घरातील एक जण बाल्कनीतून एका एसीवर बसला. परंतु, त्याच्या वजनाने एसीचे स्टँड तुटले आणि तो तिसऱ्या मजल्यापर्यंत घसरला. मग एसीच्या पाईपला त्याने पकडले. तिसऱ्या मजल्यावरील लोकांनी त्याला वर ओढून सुरक्षित स्थळी नेले. 

मूळ व्हिडियो येथे पाहा – K-News

निष्कर्ष

यामध्ये कुठेही या घरातील लोक कोरोना व्हायरसमुळे कोंडलेले होते अशी माहिती समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे घरात आग लागल्याचा हा व्हिडियो आहे. कोरोना व्हायरसशी त्याचा काही संबंध नाही. तुमच्याकडेसुद्धा असे काही शंकास्पद व्हिडियो असतील तर त्याची पडताळणी करण्यासाठी या व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:कोरोना व्हायरसमुळे घरात कोंडून ठेवलेला माणूस आग लागली म्हणून बाहेर पडला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False