लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला मारणारा हा तरुण मुस्लिम नाही; वाचा सत्य

False Social

श्रद्धाची वालकरच्या निर्मम हत्या प्रकरणानंतर हिंदू–मुस्लिम प्रेमसंबंधांना विरोध आणि लव्ह जिहादच्या आरोपांमध्ये वाढ झाल्याची दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एका तरुण जोडप्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशला मीडियावर शेअर केला जात आहे.

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, सदर हिंदू तरूणी लग्नाला नकार देत असल्यामुळे  तिच्या मुस्लिम प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. या व्हिडिओला ‘लव्ह जिहाद’चा रंग दिला जात आहे.  

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.

पडताळणीअंती कळाले की, मुलीला मारहाण करणारा तरुण मुस्लिम नसून, हिंदू आहे. या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने सांप्रदायिक रंग दिला जात आहे. 

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये दिसते की, तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तो तरुण तिला अमानुषपणे मारहाण करतो. तिला जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर लाथा मारत तिला शिवीगाळ करतो. 

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “आईवडील आणि समाजाने लाखो वेळा समजावले तरी मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडणाऱ्या हिंदू मुलींसोबत असेच होते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ संबंधित कीव्हडर्स सर्च केले असता हिंदूस्तान लाईव्ह युट्युब चॅनलवर हा  व्हिडिओ आढळला. त्यासोबतच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यातील महु गावात 21 डिसेंबर रोजी ही घटना घडली.  

प्रेयसीने लग्नास दिल्यामुळे या तरुणाने रागाच्या भरात तिला बेशुद्ध होईपर्यंत लाथाने मारले होते.

हा धागा पकडून अधिक शोध केल्यावर न्युज-24 वेबसाईटची बातमी मिळाली. त्यानुसार, तरुणीला मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव पंकज त्रिपाठी आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंकज व व्हिडिओ चित्रित करणाऱ्या भारत साकेत या दोघांना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अटक केली. 

एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट या प्रकरणी केले की, पीडित तरुणीला उपचरासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोपी पंकज त्रिपाठी ड्राइवर असून त्याचे वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने पंकज त्रिपाठीच्या घरावर बुलडोजरदेखील चालवले. 

फॅक्ट क्रेसेंडोने रीवा पोलिस अधीक्षक नवनीत भसीन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाशी कोणताही सांप्रदायिक संबंध नाही. 

“सदरील प्रकरणातील आरोपी तरुण आणि पीडिता तरुणी दोघेही हिंदू आहेत. मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव पंकड त्रिपाठी असून, तो मुस्लिम नाही,” असे ते म्हणाले. 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओला चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे. प्रेयसील मारहाणा करणारा तरुण मुस्लिम नव्हता. मध्य प्रदेशमधील या प्रकरणामध्ये तरुण आणि तरुणी दोघेही हिंदू होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला मारणारा हा तरुण मुस्लिम नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False