शेतकरी आंदोलकांना मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले का? वाचा सत्य

False राजकीय

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना केंद्र सरकारतर्फे पोलिसांप्रमाणे सुरक्षा दिली जात आहे. सोबत सामान्य कपड्यातील पण अंगात पोलिसांचे जॅकेट घातलेल्या एक व्यक्तीचा फोटो आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या फोटोचा शेतकरी आंदोलनाशी काही संबंध नाही. 

काय आहे दावा?

सामान्य कपड्यांमध्ये (जीन्स आणि टी-शर्ट) असणारे काही जण दिल्ली पोलिसांच्या घोळक्यात हातात काठ्या, डोक्यात हेल्मेट आणि अंगात सुरक्षा जॅकेट घालून उभे आहेत. शेतकऱ्यांना मारणाऱ्या अशा लोकांना सरकारतर्फे पोलिसांसारखी सुरक्षा मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शोधले हा फोटो कधीचा आहे. त्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो तर डिसेंबर 2019 मधील आहे. 

दिल्लीतील जामिया विद्यापीठ आणि जामिया नगर येथे नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात 15 डिसेंबर 2019 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली होती.

यादरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च केला होता. पोलिसांच्या या कडक कारवाईचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यापैकीच हा एक फोटो आहे. 

या फोटोवरून त्यावेळी आरोप करण्यात आला होता की, काही विशिष्ट संघटना व पक्षातील गुंडांनी पोलिसांच्या संरक्षाणात आंदोलकांना मारहाण केली. या फोटोतील व्यक्ती जीन्स व टी-शर्टमध्ये दिसतो. तो पोलिसांच्या वर्दीमध्ये नाही. 

मूळ बातमी – फ्री प्रेस जर्नल 

मग हा व्यक्ती खरंच पोलिस होता की नाही?

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी खुलासा केला होता की, लाल टी-शर्ट घातलेला हा व्यक्ती खरंच पोलिस आहे.

पोलीस उपायुक्त एम. एस. रंधवा (दिल्ली मध्य) यांनी माहिती दिली होती की, या पोलिसाचे नाव अरविंद असून तो रिक्षा-चोरीविरोधी पथकाचा तो सदस्य आहे. ही स्पेशल फोर्स असल्याने तो सामान्य कपड्यांमध्ये होता. त्यांच्याविषयी केले जाणारे सगळे दावे खोटे आहेत. 

दिल्ली आंदोलनाविषयक विविध दाव्यांचे फॅक्ट क्रेसेंडोने सत्य समोर आणलेले आहे. येथे वाचा.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, 2019 मधील जुना फोटो शेतकरी आंदोलनाशी जोडून चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे. सामान्य कपड्यांमध्ये दिसणाऱ्या या पोलिसाचा हा फोटो डिसेंबर 2019 मध्ये सीएए/एनआरसी विरोधातील आंदोलनादरम्यानचा आहे. 

Avatar

Title:शेतकरी आंदोलकांना मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False