
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या डॉक्टरांना मानवंदना दिल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्य हेडगेवार रुग्णालयातील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली.
तथ्य पडताळणीअंती हा व्हिडियो सुरतमधील असल्याचे समोर आले.
काय आहे व्हिडियोमध्ये?
सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉक्टर आणि वैदकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ वाद्यसंगीताद्वारे मानवंदना देताना दिसतात. सोबतच्या मेसेजमध्ये म्हटले की, औरंगाबादच्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना संघाने अशी मानवंदना दिली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम इन-व्हिड टुलच्या माध्यमातून व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून हा व्हिडियो औरंगाबादमधील नसल्याचे समोर आले.
हा व्हिडियो सुरतमधील किरण हॉस्पिटलमधील असल्याचे कळाले. एका स्थानिक गुजराती वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडियो पाहू शकता. यातील माहितीनुसार, 8 मे रोजी सुरतच्या किरण मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना संघाच्या सदस्यांतर्फे अशा प्रकारे मानवंदना देण्यात आली.
हरियाणा येथील भाजपचे सोशल मीडियाप्रमुख अरुण यादव यांनीदेखील हा व्हिडियो शेयर करीत राजकीय विरोधकांना उद्देशून उपरोधक ट्विट केले होते. यामध्येसुद्धा त्यांनी हा व्हिडियो सुरतमधील किरण हॉस्पिटलमधील असल्याचे म्हटले आहे.
संघाच्या सुरत शाखेतर्फे 8 मे रोजी सुरतमधील तीन दवाखान्यांमध्ये अशा प्रकारे मानवंदना देण्यात आली होती. यामध्ये किरण हॉस्पिटल, स्मिमेर हॉस्पिटल आणि डायमंड हॉस्पिटलचा समावेश होता. संघातर्फे इतर ठिकाणी देण्यात आलेल्या मानवंदनेचे फोटो खाली दिलेले आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने किरण हॉस्पिटलशीदेखील संपर्क साधला असता सांगितले की, संघाच्या कार्यकर्त्यांतर्फे हॉस्पिटलच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली होती.
निष्कर्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉक्टरांना मानवंदना देतानाचा हा व्हिडियो औरंगाबादच्या हेडगावर रुग्णालयातील नाही. हा व्हिडियो सुरतच्या किरण हॉस्पिटलमधील आहे. 8 मे रोजी तेथील डॉक्टरांना अशाप्रकारे मानवंदना देण्यात आली होती.

Title:संघाच्या कार्यकर्त्यांचा हा व्हिडियो औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयातील नाही. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
