
वाहतुकीचे नियम न पाळण्याची मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी आता नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल बसविण्यात येत आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडियोमध्ये ट्राफिक सिग्नलचे लाईट्स खांबावर नसून रस्त्यावरच लावलेले दिसतात. असे रोड स्ट्रीप पद्धतीचे दिवे मुंबई-नाशिक रोडवर बसविल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
युजरने 40 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर केली आहे. यामध्ये झेब्रा क्रॉसिंगच्या आधी स्टॉप लाईनवरच ट्राफिक दिव्यांची रेष दिसते. गाड्या या दिव्यांवरून जातात. ट्राफिक पोलिस वाहकांना सिग्नल समजण्यास मदत करताना दिसतात. युजरने दावा केला की, हा व्हिडियो नाशिक-मुंबई रोडवरील आहे.
तथ्य पडताळणी
गुगलवर New Traffic Lights On The Road असे सर्च केल्यावर विविध बातम्या समोर आल्या. फायनान्शियल टाईम्सच्या 3 जुलैच्या बातमीनुसार, हैदराबादमध्ये भारतातील पहिले एलईडी ट्राफिक सिग्नल सिस्टम बसविण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगवर बसविण्यात येणारी ही एलईडी स्ट्रीप केबीआर पार्क सिग्लवर लावण्यात आली आहे. रस्त्यावरील होर्डिंग किंवा झाडांमुळे खांबावरील सिग्नल दिसत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. या समस्येवर तोडगा म्हणून हे एलईडी स्ट्रीप लाईट्स बसविण्यात आले आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – फायनान्शियल टाईम्स । अर्काइव्ह
एएनआय वृत्तसंस्थेने यासंबंधी बातमी आणि व्हिडियो दिलेला आहे. नव्या एलईडी स्ट्रीप लाईट्स सिग्नलचे फोटो ट्विट करताना त्यांनी लिहिले की, हैदराबाद (तेलगंणा) वाहतूक पोलिसांनी केबीआर पार्क सिग्नलवर नव्या पद्धतीचे एलईडी स्ट्रीप लाईट्स बसविले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शहरात ट्राफिक सिग्नल तोडण्याचे प्रामाण वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या नव्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये शेयर करण्यात आलेला मूळ व्हिडियो पत्रकार डोनिता जोज यांनी 2 जुलै रोजी ट्विट करून शेयर केला होता. तसेच ओव्हरसीज न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरसुद्धा अपलोड करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
पोस्टमध्ये शेयर करण्यात आलेला व्हिडियो नाशिक-मुंबई रस्त्यावरील नाही. हा व्हिडियो हैदराबाद येथील आहे. भारतातील पहिले एलईडी स्ट्रीप लाईट्स हैदराबाद येथे नुकतेच बसविण्यात आले. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Title:VIDEO: नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल नाशिक-मुंबई रोडवर नाही तर हैदराबादमध्ये बसविले आहेत
Fact Check By: Agastya DeokarResult: False
