इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षामध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचे परिणाम दिसू लागले.

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना घोषणा केली की, एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. यानंतर जलील यांच्यावर दोन्ही पक्षात फूट पाडण्याचे खापर फोडले जात आहे. सोशल मीडियावर एमआयएमचे जलील आणि आमदार वारीस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेला एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र फोटो शेयर केला जात आहे. एकाने लिहिले की, फडणवीसने इम्तियाज जलील व वारीस पठाण यांना विकत घेतले. वंचित बहुजन आघाडी तुन एमआयएम केली दुर. जास्तीत जास्त व्हायरल करा असदुद्दीन ओवैसी यांच्यापर्यंत ही पोस्ट पोहचली पाहिजे…!!! 

दुसऱ्याने लिहिले की, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला वेगळं करणाऱ्या औरंगाबादच्या जलिलचा फोटो. आणखी एकाने प्रश्न उपस्थित केला की, आंदोलन तर नव्हते मग टेबलावर फुलांचा गुच्छ दिसतोय किस ख़ुशी में?

तथ्य पडताळणी

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांची युती तिसरा पर्याय म्हणून समोर आला होता. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ही युती भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांना जोरदार टक्कर देणार असे कयास बांधले जात होते. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज सत्ताधारी पक्षांशी घरोबा करीत असताना वंचित-एमआयएमचा पर्याय अधिक सक्षम वाटत होता. परंतु, या शक्यतेला मोठा धक्का बसला.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर गेल्या आठवड्यात फूट पडली. लोकसत्तेच्या बातमीनुसार, एमआयएमने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आधी 98 व नंतर 74 जागांची मागणी केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. पण जागा वाटपाचा तिढा न सुटला नाही.

इम्तियाज जलील यांनी मग एमआयएम स्वतंत्र विधानसभा लढविण्याची घोषणा केली. मग सोशल मीडियावर त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो फिरू लागला. युती तुटल्यानंतर जलील यांनी खरंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.

फेसबुक पोस्टमधील फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 4 वर्षे जुना आहे. इम्तियाज जलील यांनी स्वतः 22 जुलै 2015 रोजी ट्विट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये जलील यांनी लिहिले की, कायदा-सुरक्षा, याकुब मेमनची फाशी आणि धार्मिक तेढ आदी विषायंबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

अर्काइव्ह

म्हणजे हा फोटो यावर्षीचा नाही. तो 2015 साली काढण्यात आला होता. इम्तियाज जलील सध्या खासदार आहेत. यापूर्वी ते औरंगाबाद (मध्य) मतदारसंघातून 2014 साली आमदार म्हणून निवडूण आले होते. गेल्या मे महिन्यात ते वंचित-एमआयएमद्वारे खासदार म्हणून निवडूण आले.

फोटोमध्ये आमदार वारीस पठाणसुद्धा दिसत आहेत. त्यांनीसुद्धा अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेयर केला होता. त्यांनी लिहिले की, अलपसंख्याकांच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करताना इम्तियाज जलील. हा फोटोसुद्धा 22 जुलै 2015 रोजी शेयर करण्यात आला होता.

अर्काइव्ह

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटा 2015 साली काढलेला आहे. एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची युती तुटल्यानंतर काढलेला हा फोटो नाही.

Avatar

Title:इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False