
औरंगाबादकरांची मंगळवारची (ता. 3 डिसेंबर) सकाळ बिबट्याच्या दहशतीमध्ये गेली. शहरातील एन-1 सिडको परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची बातमी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला पकडण्यात यश आले.
दरम्यान, या बिबट्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येऊ लागले. पैकी एका व्हिडियोमध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर पोलिस काठ्या घेऊन त्याच्या मागे पळताना दिसतात. हा व्हिडियो औरंगाबादमध्ये मंगळवारी आलेल्या बिबट्याचा म्हणून पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो नाशिकमधील असल्याचे समोर आले.
तथ्य पडताळणी
रहिवासी परिसरात बिबट्या आढळल्यानंतर अनेक अफवा आणि असंबंधित फोटो/व्हिडियो व्हायरल होत असतात. त्यामुळे या व्हिडियोची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे. फॅक्ट क्रेसेंडोने एन-1 परिसरातील रहिवासी आणि स्थानिक पत्रकारांशी यासंबंधी विचारणा केली असता बिबट्याने हल्ला केला नसल्याचे कळाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करून पकडल्याचे त्यांनी सांगितले.
मग हा व्हिडियो कुठला आहे?
नाशिक परिसरात बिबट्याचे शहरवस्तीमध्ये येण्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी आलेल्या आहेत. हे लक्षात घेताल युट्यूबवर Leopard Attack Nashik असे सर्च केले. त्यातून झी-24 तास वाहिनीचा खाली दिलेला व्हिडियो आढळला.
यानुसार, हा व्हिडियो 25 जानेवारी रोजी सकाळी नाशिकच्या सावरकर नगर भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा आहे. लोकमतच्या बातमीनुसार, दोन तासांच्या थरारानंतर नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथकाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह दोन पत्रकार आणि शिवसेनेचा नगरसेवक जखमी झाले होते. हा व्हिडियो या हल्ल्याचा आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत । लोकसत्ता । एबीपी माझा
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, बिबट्याने हल्ला केल्याचा हा व्हिडियो औरंगाबादचा नाही. हा व्हिडियो नाशिकमधील सावरकरनगर भागातील आहे. तेथे 25 जानेवारी 2019 रोजी बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते. औरंगाबादमध्ये आढळलेल्या बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पससवूदेखील नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

Title:नाशिकमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडियो औरंगाबादचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
