छ. संभाजीनगरमध्ये वाघांचा सुळसुळाट? व्हायरल अफवेमुळे नागरिक हैराण; वाचा सत्य

False Social

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) वाघ फिरत असल्याचे व्हिडिओ शेअर करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देणारे मेसेज व्हायरल होत आहेत. वन विभागाकडून शहरातील नागरिकांना रात्री बाहेर न फिरण्याचे आवाहन केले जात असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघ दिसल्याची अफवा पसरत आहे. नाशिकमधील व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने शेअर करून भीती पसरविली जात आहे. 

काय आहे दावा?

एका जीपमध्ये वन विभागाचे अधिकारी नागरिकांना रात्री बाहेर न पडतानाचे आवाहन करताना दिसतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, “औरंगाबाद शहरामध्ये वाघांचा सुळसुळाट नागरिकांना रात्री न फिरण्यास वन विभागाने सतर्क केले आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

हाच व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरदेखील खूप शेअर केला जात आहे. औरंगाबादमधील जयभवानीनगर भागात वाघ आढल्याचे याद्वारे सांगितले जात आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओची बारकाईनी तपासणी केली. त्यामध्ये जयभवानी रोड, लवटे नगर, अशोक नगर क्र. 1 अशी नावे घेण्यात आलेली आहेत. 

त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, ही ठिकाणे नाशिक शहरातमध्ये आहेत. तसा युट्यूबवर एक व्हिडिओसुद्धा आढळला.  लोकमतच्या नाशिक आवृत्तीने याविषयी प्रकाशित केलेली बातमीसुद्धा सापडली.

गेल्या महिन्यात नाशिकच्या जय भवानीरोड भागात बिबट्या दिसला होता. तसेच 23 जुलै रोजी बिबट्या या ठिकाणी एकावर हल्ला देखील केला होता. त्याचा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला होता. 

फॅक्ट क्रेसेंडोने नाशिक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करतानाचा तो व्हायरल व्हिडिओ नाशिक वन विभागाचा आहे. गेल्या आठवड्यात नाशिकमधील जय भवानीरोड परिसरात बिबिट्याने हल्ला केल्यानंतर नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. तो व्हिडिओ औरंगाबादचा नाही. 

औरंगाबाद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ औरंगाबाद शहरातील नाही. स्थानिक वन विभागाने वाघ किंवा बिबट्यासंदर्भाता कोणाताही इशारा दिलेला नाही. नागरिकांनी भीती पसरेल अशा अफवा पसरवू नये. 

यापूर्वीदेखील शहरातील एन-1 सिडको परिसरामध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याच्या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडियोसुद्धा नाशिकमधील असल्याचे समोर आले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) बिबट्या किंवा वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर चुकीचा दावा केला जात आहे. नाशिकमधील व्हिडिओ औरंगाबादचा म्हणून शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छ. संभाजीनगरमध्ये वाघांचा सुळसुळाट? व्हायरल अफवेमुळे नागरिक हैराण; वाचा सत्य

Written By: Agastya Deokar 

Result: False