
इस्लामिक स्टेटचा (इसिस) म्होरक्या अबू बकर अल-बगदादीविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खुद्द याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेने या मोहिमेचा व्हिडियो फुटेजदेखील प्रसिद्ध केले. अमेरिकेच्या सैन्याने इसिसच्या तळांवर हल्ला करून बगदादीवर निशाणा साधला होता.
सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, अमेरिकेने बगदादीला मारण्यासाठी डेल्टा फोर्सचा रोबोट कंमोडो वापरला होता. हल्ला करण्यापूर्वी त्या रोबोटची कशी चाचणी घेण्यात आली होती, याचा हा व्हिडियो असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये शेयर करण्यात आलेल्या अडीच मिनिटांच्या व्हिडियोमध्ये युद्धामध्ये वापरण्यात येणाऱ्या रोबोटची चाचणी दाखवण्यात आली आहे. सोबत लिहिले की, हा डेल्टा फोर्सचा रोबोट कंमोडो आहे. याच रोबोटचा बगदादीला मारण्यात वापर करण्यात आला होता. तत्पूर्वी त्याची अशी चाचणी घेण्यात आली.
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोची सत्यता जाणून घेण्यासाठी त्यातील की-फ्रेम्स निवडून गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा रशियन भाषेतील एका वेबसाईटवर हा व्हिडियो आढळला. ट्विटरवरदेखील हा व्हिडियो याच नावाने रशियन भाषेतून 27 ऑक्टोबर रोजी शेयर केल्याचे आढळले. गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने भाषांतर केल्यावर याचे शीर्षक Bosstown Dynamics continue to mock robots असे आढळले.
हा धागा पकडून मग जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा कळाले की हा खरा व्हिडियो नाही. हा CGI तंत्रज्ञानाने तयार केलेला व्हिडियो आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरातील कॉरिडोर डिजीटल नावाच्या व्हिडियो प्रोडक्शन कंपनीने कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर करून हा व्हिडियो तयार केला आहे. याप्रकारचे याआधीसुद्धा त्यांनी व्हिडियो तयार केले आहेत. त्याला बॉसटाऊन डायनामिक्स असे नाव दिले आहे. हा केवळ पॅरोडी व्हिडियो आहे. भविष्यात रोबोट काय करू शकतात हे दाखविण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे.
मूळ लेख येथे पाहा – फ्युचरिझम
मग आम्ही मूळ व्हिडियोचा शोध घेतला. कॉरिडोर युट्युब चॅनेलवर हा व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. New Robot Makes Soldiers Obsolete (Bosstown Dynamics) असे या व्हिडियोचे शीर्षक आहे.
हा व्हिडियो CGI तंत्रज्ञानाचा वापर करून कसा तयार करण्यात आला याची मेकिंगसुद्धा त्यांनी शेयर केली आहे. ती तुम्ही खालील व्हिडियोमध्ये पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, हा रोबोट खरा नसून, CGI तंत्रज्ञानाने तो तयार करण्यात आलेला आहे. हा केवळ एक पॅरोडी व्हिडियो आहे. हा काही डेल्टा फोर्सचा रोबोट कंमोडो नाही आणि बगदादीला मारण्यात त्याचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:बगदादीला मारण्यासाठी या रोबोटचा वापर करण्यात आला होता का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
