अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियातील आहे. अमेरिकेच्या नासामधील नाही. वाचा सत्य

Mixture आंतरराष्ट्रीय

पहिल्या राफेल विमानाला सेवेत दाखल करण्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाच्या चकाखाली लिंबू ठेवले आणि टीकेची एकच झोड उठली. अंधाश्रद्धा की परंपरा असा यावरून वाद सुरू झाला. जगभरात केले जाणाऱ्या धार्मिक रितीरिवाजांचे दाखले देण्यात येऊ लागले. (उदा. जहाजाला प्रथम पाण्यात उतरविताना शॅम्पेनची बॉटल फोडणे). एवढेच नाही तर नासासुद्धा अंतराळवीरांना अवकाशात झेपवण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मानुसार प्रार्थना करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

पुरावा म्हणून प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या यानाचे उड्डाण होण्यापूर्वीचा एक व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये एक ख्रिस्ती पाद्री हातात क्रॉस घेऊन अंगावर पवित्र पाणी शिंपडत आहे. त्यांचे मिशन यशस्वी होण्याची तो प्रार्थना करतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर (9049043487) हा व्हिडियो पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुवरील पोस्टमध्ये 30 सेंकदांची एक व्हिडियो क्लिप शेयर केलेली आहे. यामध्ये एक पाद्री प्रार्थना करीत अंतराळवीरांवर क्रॉस फिरवून पवित्र पाणी शिंपडतो. अंतराळवीरांमध्ये सुनीत विलियम्सदेखील आहेत. पोस्टकर्त्याने लिहिलेले की, त्यांचे ते ‘पवित्र पाणी’ आपली ती ‘कडू लिंब?’ ‘अमेरिकेच्या’ नासात अंतराळविरांना स्पेसक्राफ्टमध्ये पाठवताना क्रॉसवर पाणी शिंपडुन फिरवला जातो. तुम्हीच पहा सोबत भारतीय वंशाची ‘सुनीता विलीएम्स’.’ प्रत्येकाच्या श्रध्देचा आणि परंपरेचा विषय आहे. आपली संस्कृती जपणं यात वाईट काय….! म्हणजे ही श्रध्दा आणि आपण करतो ते कर्मकांड? 

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

सुनीता विल्यम्स व्हिडियोमध्ये दिसत असल्याने त्या कधी अवकाशात गेल्या होत्या याची माहिती घेतली. नासाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, सुनीत विल्यम्स आतापर्यंत दोन वेळा आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र (आयएसएस) मोहिमेवर गेलेल्या आहेत. सर्वप्रथम 2006 साली त्यांनी अवकाशात उड्डाण केले होते. त्यानंतर ‘एक्सपेडिशन32/33’ मोहिमेअंतर्गत त्या दुसऱ्या वेळी स्पेस मिशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये त्यांनी 15 जुलै 2012 रोजी कझाकस्तान येथील बैकनूर अवकाश केंद्र येथून उड्डाण केले होते. या मिशनमध्ये त्यांच्यासोबत रशियन सोयुझ कमांडर युरी मेलेन्चेन्को आणि जपानचे फ्लाईट इंजिनियर अकिखो होशाईड हेदेखील होते.

मूळ आर्टिकल येथे वाचा – नासा

या माहितीच्या आधारे शोध घेतला असता 2012 साली विल्यम्स यांच्या दुसऱ्या स्पेस मिशनच्या उड्डाणापूर्वीचा एक व्हिडियो आढळला. कझाकस्तान येथील बैकनूर कॉस्मोड्रोम उड्डाणकेंद्रावरून त्यांनी आयएसएसकडे झेप घेतली होती. तत्पूर्वी कॉस्मोनॉट हॉटेलमध्ये तिन्ही अंतराळवीरांचे स्वागत करून मिशनच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या तिघांनी दरवाजावर सहीदेखील केली. 

खाली दिलेल्या व्हिडियोच्या दुसऱ्या मिनिटांपासून तुम्ही पाहू शकता की, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या एका पुजाऱ्याने या तिन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली. तसेच त्यांच्यावर क्रॉस फिरवून पवित्र पाणी देखील शिंपले. त्यानंतर ते यानाकडे रवाना झाले. मग स्पेस चढवून त्यांनी उड्डाण केले होते.

याचा अर्थ की, ख्रिस्ती पुजाऱ्याने अंगावर क्रॉस फिरवून पाणी शिंपडण्याचा प्रकार अमेरिकेच्या नासामध्ये नाही तर, कझाकस्तानमधील बैकनूर अवकाश केंद्रामध्ये झाला होता. रशियाचे हे स्पेसपोर्ट आहे. रशियाच्या या केंद्रामध्ये दर अवकाश मोहिमेच्या वेळी पारंपरिक ख्रिस्ती धर्माच्या रितीरिवाजांनुसार रॉकेट आणि अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडून आशिर्वाद दिला जातो. वर्षानुवर्षे रशियन स्पेस केंद्रावर ही प्रथा आहे. सुनीता विल्यम्स व अंतराळवीरांचे या मिशनचे विविध फोटो तुम्ही येथे पाहू शकता.

मूळ फोटो येथे पाहा – अलामीविकिमीडिया

अंधश्रद्धा की प्रथा?

बीबीसीने The strangest space launch rituals अशा मथळ्याखाली रशियामध्ये स्पेस मिशनदरम्यान केल्या जाणाऱ्या अनेक अचाट गोष्टींची माहिती दिली आहे. अमेरिकेचे स्पेस शटल यान बंद झाल्यानंतर आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला (आयएसएस) जाण्यासाठी आता फक्त रशियन सोयुझ यान हाच केवळ एक पर्याय आहे. त्यामुळे नासाला आयएसएस येथे अंतराळवीर पाठविण्यासाठी रशियाचीच मदत घ्यावी लागते. त्याशिवाय दुसरा पर्यायदेखील नाही. म्हणून रशियाच्या चालीरिती त्यांना पाळाव्याच लागतात.

मूळ लेख येथे वाचा – बीबीसीअर्काइव्ह

रशियामध्ये धार्मिकतेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे दर स्पेस मिशनमध्ये ऑर्थोडॉक्स चर्चच्या पुजाऱ्यांकडून विधिवत रॉकेट व अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी पूजा करण्यात येते. पवित्र पाणी शिंपडणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. त्याशिवाय उड्डाणाच्या आदल्या रात्री ‘द व्हाईट सन ऑफ द डेझर्ट’ हा चित्रपट पाहण्याची प्रथा आहे. अंतराळवीरांनी कॉस्मोनॉट हॉटेलच्या दरवाजावर स्वाक्षरीदेखील करावी लागते. अंतराळवीरांनी लाँचपॅडवर रॉकेटला उभे करताना पाहणे रशियामध्ये अशुभ मानले जाते म्हणून त्यांना ते बघू दिले जात नाही. आणखी एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे रशियामधून उड्डाण करताना अंतराळवीर त्यांच्या बसच्या उजव्या हाताच्या मागच्या चाकावर लघवी करतात.

अनेकांना या गोष्टी आक्षेपार्ह वाटतील परंतु, रशियाची मदत घ्यायची तर एवढी किंमत तर चुकवावीच लागणार. अमेरिकाही त्याला काही करू शकत नाही. याविषयी अधिक सविस्तर येथे वाचा.

निष्कर्ष

सुनीता विल्यम्स व इतर अंतराळवीरांवर क्रॉस फिरवून पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियाच्या अवकाश केंद्रातील आहे. ही रशियातील प्रथा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नासामध्ये अंतराळवीरांना अवकाशात पाठवताना पवित्र पाणी शिंपडले जाते, असे म्हणने चूक आहे.

Avatar

Title:अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियातील आहे. अमेरिकेच्या नासामधील नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture