एकादशीच्या उपवासामुळे कॅन्सर होत नसल्याचे सिद्ध करणाऱ्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळाले का?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, एकादशीचा उपवास केल्यामुळे कॅन्सरचा धोका टळतो. हा शोध लावणाऱ्या दोन वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. यावरून सिद्ध होते की, सनातन धर्माला काही तोड नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

पोस्टमध्ये काय आहे?

एकादशीचा उपवास केला असता कॅन्सर होत नाही. जो व्यक्ती वर्षभरात कमीतकमी 20 दिवस 10 तास काही न खाता-पिता राहतो, त्याचा कॅन्सर होण्याचा धोका 90 टक्क्यांनी टळतो. कारण शरीर जेव्हा भुकेले असते तेव्हा ते कॅन्सरपेशींना नष्ट करण्यास सुरुवात करते. हेच संशोधन करणाऱ्या तासुकू होंजो (जपान) आणि जेम्स एलिसन (अमेरिका) या वैज्ञानिकांना वैद्कीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी ज्या दोन वैज्ञानिकांची नावे दिली आहेत त्यांचा इंटरनेटवर शोध घेतला. तेव्हा कळाले की, ही नावे खरी आहेत.

जपानमधील क्योटो विद्यापीठातील प्रा. डॉ. तासुकू होंजो आणि अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील प्रा. जेम्स पी एलिसन यांना गेल्यावर्षी (2018) वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या मिळाले होते. लोकसत्तेनुसार, कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात आला. या दोघांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते.

मग त्यांना एकादशीच्या उपवासासंदर्भातील संशोधनासाठी हा नोबेल मिळाला का?

बीबीसीनुसार, कॅन्सर पेशींना नष्ट करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या प्रोटीनला आळा घालून रोगप्रतिकारक पेशींना बळकट करण्याची नवी पद्धत या दोन्ही शास्त्रज्ञांनी शोधून काढली. त्यांच्या संशोधनामुळे विविध प्रकारच्या कर्करोगाला बरे करण्यासाठी आवश्यक औषधांची निर्मिती करणे शक्य झाली आहे. इम्युन चेकपॉईंट थेरपी असे उपचारपद्धतीचे नाव आहे. यामध्ये कुठेही उपवास किंवा आहारविषयक कोणताही उल्लेख नाही.

मूळ बातमी येथे वाचा – बीबीसीअर्काइव्ह

नोबेल प्राईजच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा या दोघांनी उपवास किंवा आपल्या आहार सवयींमुळे कॅन्सरविरुद्ध कसा बचाव होतो असे काही संशोधन केल्याची नोंद नाही. तुम्ही स्वतः ते येते वाचू शकता.  तासुकू आणि एलिसन यांच्या संशोधनाचा उल्लेख Releasing The Brakes Of Immunity असा करण्यात आला आहे.

काय याचा अर्थ?

अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या (ASCO) वेबसाईटनुसार, कॅन्सरच्या या उपचारपद्धतीला इम्युनोथेरपी (Immunotherapy) म्हणतात. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देऊन कॅन्सर रोखण्यात अधिक सशक्त केले जाते. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेली औषधी किंवा शरीरातीलच नैसर्गिक तत्वांचा वापर करून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यात येते.

सविस्तर येथे वाचा – Cancer.Net | अर्काइव्ह

काय आहे मूळ संशोधन?

आपल्या शरीरातील टी-सेल नामक पेशी बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून बचाव करण्यासाचे काम करीत असतात. कॅन्सरपेशी नष्ट करण्याचेही काम टी-सेल करतात. संपूर्ण शरीरात भ्रमण करून धोक्याची लक्षणे ते शोधत असतात. त्यानुसार, काय कारवाई करायची याचा ते निर्णयदेखील घेतात. एक तर ते धोक्याकडे दुर्लक्ष करू शकतात किंवा रोगप्रतिकारक पेशींना याची माहिती देऊ शकतात. 

टी-सेलच्या पृष्ठभागावरील मोलिक्युलर मशीनरी कार्यरत असते जी निर्णय घेण्यास मदत करते. एलिसन आणि होंजो यांच्या संशोधनामुळे टी-सेलला सक्रिय किंवा निष्क्रिय करण्याचे काम करणाऱ्या CTLA-4 आणि PD-1 या दोन घटकांची सविस्तर माहिती मिळाली.1996 साली जेम्स एलिसन यांनी शोध लावला की, CTLA-4 हा घटक टी-सेलला कॅन्सरसारख्या धोक्याची माहिती रोगप्रतिकारक यंत्रणेला देण्यापासून रोखते. होंजो यांच्या संशोधनातून कळाले की, PD-1 नावाचा घटक कॅन्सर पेशीच्या PD-L1 वर चिटकून बसतो. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरपेशींची माहिती मिळत नाही.

सविस्तर येते वाचा – कॅन्सर रिसर्च यूके

त्यांच्या संशोधनातून असे औषध निर्माण करणे शक्य झाले जे CTLA-4, PD-1 आणि PD-L1 चा प्रभाव रोखून टी-सेलला सक्रिय करते. पर्यायाने रोगप्रतिकारक पेशी कर्करोगपेशींना नष्ट करतात आणि कॅन्सरचा धोका टळतो. 

यावरून स्पष्ट होते की, होंजो आणि एलिसन यांनी असे संशोधन केले आहे ज्याद्वारे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे औषध निर्माण करता येते. त्याचा उपवास करून कॅन्सरचा धोका टळतो असा कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हे संशोधन नेमके काय याचा व्हिडियो खाली पाहा.

निष्कर्ष

एकादशीचा उपवास केल्याने कॅन्सरपासून बचाव होतो हे सिद्ध करणाऱ्या संशोधकांना नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना गेल्या वर्षी इम्युनोथेरपीचे कॅन्सरवरील प्रभावी औषध तयार करण्यासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:एकादशीच्या उपवासामुळे कॅन्सर होत नसल्याचे सिद्ध करणाऱ्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळाले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •