ताजिकिस्तानमधील गायिकेचा व्हिडियो मराठी सिंगर गीता माळीच्या नावे फिरवला जात आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी यांचे नुकतेच कार अपघातमध्ये निधन झाले. अमेरिकेत सादरीकरण केल्यानंतर गुरूवारी नाशिकला परत येताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांचा अपघात झाला होता. युवा गायिकेच्या निधनावर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चाहत्यांनी गीता माळीचे फोटो आणि व्हिडियो शेयर करून तिला श्रद्धांजली अर्पण केली. परंतु, असे करीत असताना अनेकांनी ती सादरीकरण करत असतानाचा म्हणून एक दुसऱ्याच गायिकेचा व्हिडियो शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत तो व्हिडियो ताजिकिस्तानमधील प्रसिद्ध गायिका नोझिया कारोमातुल्लो हिचा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडिया युजर्सने गीता माळी यांना श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले की, “अत्यंत दुःखद वार्ता. सुप्रसिद्ध सिंगर; नाशिकचे भूषण; गिता माळी अपघातात दुःख निधन…अमेरिका मधुन शो आटोपून 4 तासांपूर्वी मुंबई विमानतळावर आली अन नाशिक ला येत असतांना शहापुर येथे अपघातात दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली..

सोबत दोन मिनिटांचा एक व्हिडियो शेयर केला. यामध्ये एक गायिका फुटबॉल स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांसमोर शोले चित्रपटातील ‘जब तक है प्यार’ हे गाणे सादर करीत आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो खरंच गीता माळी यांचा आहे का हे शोधण्यासाठी त्यातील की-फ्रेम्स निवडूण यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून समोर आलेल्या रिझल्ट्समध्ये हा व्हिडियो प्रामुख्याने रशियन भाषेतील मजकुरासह शेयर करण्यात आल्याचे आढळले. अनेक व्हिडियोच्या शीर्षकामध्ये या गायिकेचे नाव नोझिया कारोमातुल्लो असे लिहिलेले आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. त्यानंतर हमिद ओनमू नावाच्या युट्यूब चॅनेलवर याच गायिकेचा 23 सप्टेंबर 2014 रोजी अपलोड केलेला एक व्हिडियो आढळला. व्हिडियोच्या शीर्षकानुसार, नोझिया कारोमातुल्लो इस्तरऊशान येथे सादरीकरण करीत आहे. संपूर्ण व्हिडियो पाहिल्यानंतर कळते की, या गायिकेने विविध भाषेतील गाणी सादर केलेली आहेत.

इस्तरऊशान हे ताजिकिस्तानमधील एक शहर आहे. तेथील Istaravshan-Arena या फुटबॉल ग्राऊंडमध्ये ती गात आहे. याच कार्यक्रमातील दुसरा व्हिडियो मिळाला. यामध्ये ती शोले चित्रपटातील हिंदी गाणे गाताना दिसते. तिचे गाणे झाल्यानंतर आणखी एका गायिकेने या ठिकाणी सादरीकरण केले होते. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

कोण आहे नोझिया कारोमातुल्लो?

नोझिया कारोमातुल्ली ही ताजिकिस्तानमधील गायिका आहे. ती ताजिक, पर्शियन आणि हिंदी गाण्यांसाठी ती प्रसिद्ध आहे. तिने भारतातून शास्त्रीय गायन आणि नृत्यामध्ये शिक्षण घेतलेले आहे. ताजिकिस्तानमधील टीव्ही, रेडिओ आणि विविध कॉन्सर्टमध्ये तिचा सहभाग असतो. 2007 साली ती एका कथ्थक नृत्य स्पर्धेची विजेतीदेखील ठरली होती.

गीता माळी यांचे निधन

मूळच्या नाशिक येथील रहिवासी असलेल्या गीता माळी यांनी देश-विदेशातील अनेक कार्यक्रमांत सादरीकरण केले होते. अनेक दिग्गजांसोबत त्यांनी गायन केले आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून अमेरिकेतील कार्यक्रमाचे फोटो शेयर केलेले आहेत. तसेच अमेरिकेहून परतल्यानंतर मुंबई विमानतळावरून त्यांनी शेवटचे फोटो पोस्ट केले होते. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

निष्कर्षः

सदरील व्हिडियोमध्ये शोले चित्रपटातील हिंदी गाणे गात असलेली गायिका गीता माळी नाही. हा व्हिडियो ताजिकिस्तानमधील प्रसिद्ध गायिका नोझिया कारोमातुल्लो हिचा आहे. त्यामुळे सदरील पोस्ट अर्धसत्य आहे.

Avatar

Title:ताजिकिस्तानमधील गायिकेचा व्हिडियो मराठी सिंगर गीता माळीच्या नावे फिरवला जात आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False