FACT CHECK: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले का?

False राजकीय

महाराष्ट्र विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अशाच एका सभेत त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाविषयी केलेल्या वक्तव्याची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. 15 सेंकदाच्या या क्लिपच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, मुंडे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक

काय आहे क्लिपमध्ये?

30 ऑगस्ट रोजी शेयर करण्यात आलेल्या 15 सेंकदाच्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री म्हणतात की, “आणि मला अतिशय आनंद आहे…आमचे नेते गोपीनाथजी अचानक आम्हाला सोडून निघून गेले.” हेच वाक्य परत परत (Loop) ऐकू येते. सोबत कॅप्शन दिले की, मुख्यमंत्र्यांचे डोकं ठिकाणावर आहे का?

फॅक्ट चेक करेपर्यंत या व्हिडियोला 1.16 लाख व्ह्युव्ज मिळाले असून, 1600 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडियो खाली कमेंट करून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर, अनेकांनी या क्लिपविषयी शंका उपस्थित केली आहे.

तथ्य पडताळणी

महाजनादेश यात्रेदरम्यानची भाषणे, रॅली, सभांचे व्हिडियो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित केले जातात. तेथे शोध घेतल्यावर त्यांनी बीड येथे घेतलेल्या सभेचा व्हिडियो आढळला. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण आहे. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर 26 ऑगस्ट रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

संपूर्ण व्हिडियो पाहिल्यावर कळते की, सदरील व्हायरल क्लिप याच व्हिडियोतून घेतलेली आहे. ती तुम्ही 1.10 मिनिटांपासून ऐकू शकता. यातून असेही कळते की, मुंडे यांच्या निधनाविषय़ी मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केलेला नाही. 

58 व्या सेंकदापासून मुख्यमंत्री म्हणतात की, “बीड जिल्हा कालही गोपीनाथरावांचा होता, आजही गोपीनाथरावांचा आहे आणि उद्याही गोपीनाथराव मुंडे यांचाच असेल. आणि मला अतिशय आनंद आहे…आमचे नेते गोपीनाथजी अचानक आम्हाला सोडून निघून गेले. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की, आता आमचं काय होणार…गोपीनाथजी नाहीत आता आम्ही काय करणार…पण खऱ्या अर्थाने गोपीनाथजींची जी परंपरा आहे, जो वारसा आहे, तो समर्थपणे चालवण्याचं काम पंकजाताई आणि प्रितमताई यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून आजच्या महाजनादेश यात्रेची सुरूवात करताना एकीकडे मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो तर दुसरीकडे आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो.”

खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये व्हायरल क्लिप आणि मूळ व्हिडियोतील मुख्यमंत्र्याचे म्हणने यांची तुलना केली आहे. 

यावरून लक्षात येते की, मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाविषयी आनंद व्यक्त केला नव्हता. मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांनी वडिलांचा वारसा समर्थपणे चालवल असल्याचा त्यांना आनंद झाल्याचे त्यांचे म्हणने होते. वाक्याची रचना आणि एडिट केलेली छोटीशी क्लिप यातून भ्रम निर्माण होतो.

निष्कर्ष

मुंडे यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री आनंद व्यक्त करतानाची 5 सेंकदाची क्लिप मूळात महाजनादेश यात्रेदरम्यान बीड येथे 26 ऑगस्ट रोजी घेतलेल्या सभेतील भाषणाच्या व्हिडियोतून एडिट करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंकजा आणि प्रितम मुंडे वडिलांचा वारसा चांगला चालवत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे ही पोस्ट लोकांमध्ये भ्रम निर्माम करीत आहे.

Avatar

Title:FACT CHECK: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False