एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल होत आहे.

काय आहे दावा?

व्हिडिओमध्ये दिसते की, एका बाईकस्वाराचा पोलिसांची वाहने पाठलाग करीत आहेत. एका ठिकाणी त्याला अडविले असता दुचाकी घसरून पडते आणि मग एक पोलिस चालकाला लाथ मारून खाली पाडतो.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “श्रीनगर मध्ये अतिरेक्याने शस्त्र काढे पर्यंत भारतीय सैनिकांने कशी छातीत लाथ घातली ते आवर्जून पहा... आणि दुसऱ्यांना पाठवा...Hat's of Indian soldiers”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळते की, पोलिसांची वाहने भारतातील वाटत नाहीत. त्यामुळे कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमधील आहे.

व्हायरलटॅब न्यूज वेबसाईटनुसार, ब्राझीलमधील पेरोल शहरात 1 ऑगस्ट 2021 रोजी हा व्हिडिओ काढण्यात आला होता. गस्त घालणाऱ्या पोलिसांना पाहून जेव्हा एक दुचाकीस्वार संशयितरीत्या पळू लागल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला होता.

मूळ बातमी – व्हायरलन्यूज टॅब

मग हा व्हिडिओ खरंच ब्राझीलमधील आहे का?

गुगल मॅपच्या सहाय्याने शोध घेतल्यावर ही अटक जेथे झाली ते ठिकाणी मिळाले. खाली गुगल मॅपच्या स्ट्रीटव्ह्युवचा स्क्रीनशॉट आणि व्हिडिओतील जागा यांची तुलना पाहू शकता. यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ ब्राझीलमधील आहे.

निष्कर्ष

ब्राझीलमध्ये दुचाकीस्वाराला अटक करतानाचा व्हिडिओ श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला अटक केली म्हणून व्हायरल केली जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: False