
भारतामध्ये गुन्हागार नेते निवडणूक कशी जिंकतात हे उलगडून सांगणारा एक व्हिडिओ सध्या बराच गाजत आहे. राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी शैलजाकांत मिश्रा यांचा असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडियो खरं तर नितीश राजपूत नावाच्या आयटी प्रोफेशनल तरुणाचा आहे.
काय आहे व्हिडियोमध्ये?
सात मिनिटांच्या व्हिडियोमध्ये एक तरुण सांगतो की, “संसदेमध्ये सध्या 43 टक्के खासदार असे आहेत ज्यांच्यावर गुन्हे नोंदविलेले आहेत. यापैकी 29 टक्के असे आहेत ज्यांच्यावर खून, बलात्कार, अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविलेले आहेत.” गुन्हेगार नेते कसे निवडणूक जिंकतात, त्यासाठी कायद्यात कशी पळवाट शोधतात, हे माहित असूनही लोक त्यांना मत देतात, अशी सगळी तो माहिती देतो.
अनेक जणांनी हा व्हिडियो शेयर करताना म्हटले की, व्हिडियोतील व्यक्ती IPS शैलजाकांत मिश्रा आहेत.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर niteshrajpute असा वॉटरमार्क दिसतो.
हा धागा पकडून सर्च केल्यावर युट्यूबवर नितीश राजपूत नावाच्या एका तरुणाचे अकाउंट सापडले. या अकाउंटवर हा व्हिडिओ 26 जुलै रोजी अपलोड केलेला आढळला.
व्हायरल व्हिडियो आणि हा व्हिडियो एकच आहे. हाच व्हिडियो त्याने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरदेखील शेयर केलेला आहे.
कोण आहे नितीश राजपूत?
नितीश राजपूतच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार तो आयटी क्षेत्रातील व्यावसायिक असून तो आयटी इंजिनियर आहे. तो आयपीएस अधिकारी असल्याचे त्याने कुठेही म्हटलेले नाही.
हिंदुस्थान टाईम्सने त्याच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार, 28 वर्षीय नितीश सुलतानपूर येथील असून सध्या दिल्लीमध्ये राहतो. बहुराष्ट्रीय कंपनीचा तो बिझनेस हेड असून आयटी क्षेत्रात तो कार्यशील आहे.
सोशल मीडियावर विविध सामाजिक व राजकीय विषयांवर स्वतःची मते मांडत असतो. त्यांच्या विश्लेषणात्मक व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स । अर्काइव्ह
आयपीएस शैलजाकांत मिश्रा कोण आहेत?
शैलजाकांत मिश्रा हे 1977 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2012 साली तो निवृत्त झाले. सुपरकॉप म्हणून उत्तरप्रदेशमध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांची फेसबुक प्रोफाईल तुम्ही येथे पाहू शकता.
शैलजाकांत मिश्रा त्यांच्या प्रेरणादायी भाषणांसाठी इंटरनेटवर प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडियो तुम्ही पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडियोतील तरुण आयपीएस शैलजाकांत मिश्रा नाही. त्याचे नाव नितीश राजपूत असून तो आयटी इंजिनियर आहे.

Title:गुन्हेगार नेत्यांची पोलखोल करणारा हा व्हिडियो IPS शैलजाकांत मिश्रा यांचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
