
तमिळनाडुमध्ये हिंदी भाषिक कामगारांना मारहाण केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उघडपणे हल्ल्यांचे हिंसक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहेत की, या घटना तमिळनाडूमधील असून तेथे उत्तर भारतातून आलेल्या बिहारी कामागारांना असे मारले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले अनेक व्हिडिओ तमिळनाडुतील नसून, असंबंधित आणि इतर ठिकाणांचे व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहेत.
खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे.
व्हिडिओ क्र. 1

सत्य –
हा व्हिडिओ कर्नाटकमधील आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी बंगळुरूजवळील एका गावामध्ये पार्किंगच्या वादातून चार जणांनी पीडित भरत कुमार (23) आणि प्रतीक (17) यांच्यावर चाकूने हल्ला केला होता.
व्हिडिओ क्र. 2

सत्य –
सदरील घटना जरी तमिळनाडुची असली तर पीडित व्यक्ती गोकुळ त्याच राज्यातील कोईम्बतूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. गोकुळवर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो आणि त्याचा मित्र मनोज 13 फेब्रुवारी 2023 रोजी एका खूनप्रकरणी कोइम्बतूर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यासाठी आले होते. तेथून परत जाताना चार जणांनी त्यांचा पाठलाग करून गोकुळची हत्या केली. तसेच मनोजच्या डोक्यावर विळ्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. येथे वाचा.
व्हिडिओ क्र. 3

सत्य –
हा व्हिडिओ हैदराबादमधील घटनेचा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, पीडित साईनाथ याची वैयक्तित वादातून भरदिवसा हल्ला करून हत्या झाली होती. 22 जानेवारी 2023 रोजी तो रस्त्यावरून जात असताना तीन जणांनी त्यांच्यावर विळा आणि लोखंडी पाईपने मारहाण केली होती.
व्हिडिओ क्र. 4

सत्य –
हा व्हिडिओ पंजाबमधील आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील जगतपुरा गावात 19 फेब्रुवारी 2023 रोजी ही घटना घडली होती. पीडित सोनू कुमार याला वैयक्तिक वादातून मारहाण करण्यात आली होती.
व्हिडिओ क्र. 5

सत्य –
हा व्हिडिओ हैदराबादमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा आहे. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, मृत व्यक्तीचे नाव रमेश असून त्याच्यावर महेश गौड नामक व्यक्तीच्या खूनाचा आरोप होता. 26 सप्टेंबर 2018 रोजी रमेश त्या प्रकरणी सुनवाईनंतर न्यायालयातून बाहेर पडल्यावर महेशचे वडील आणि काका या दोघांनी हल्ला केला होता.
व्हिडिओ क्र. 6

सत्य –
हा व्हिडिओ राजस्थानमधील आहे. दैनिक भास्करच्या बातमीनुसार, ही घटना 20 फेब्रुवारी 2023 रोजी जोधपूरमध्ये घडली होती. अनिल चौहान व मुकेश चौहान यांनी 55 वर्षीय जुगराज चौहान यांची जमिनीच्या वादातून चाकू व दगडाने ठेचून हत्या केली होती.
तमिळनाडू पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करीत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले व्हिडिओ तमिळनाडुशी संबंधित नाहीत. खोट्या दाव्यासह ते शेअर केले जात आहेत.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:तमिळनाडुमध्ये बिहारी कामगारांना मारहाण म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
