भगतसिंग यांना चाबकाने फटके मारतानाचा हा फोटो नाही; वाचा त्या फोटोचे सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

शहीद भगतसिंग यांना इंग्रज अधिकारी चाबकाने फटके मारतानाचा फोटो म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. खांबाला बांधलेल्या एका शीख तरुणाला इंग्रज पोलिस मारताना यामध्ये दिसते.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा भगतसिंग यांचा फोटो नसल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) वाचकाने पुढील फोटो पाठवला.

हाच फोटो फेसबुकवरदेखील शेयर करण्यात आलेला आहे. त्याला कॅप्शन दिली की, भगतसिंग यांना इंग्रज अधिकारी चाबकाने घाव घालताना. तरीही भगतसिंग यांनी माफीनामा सादर नाही केला.

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले असता  अहमद अली कसुरी यांनी 2019 साली लिहिलेल्या एका लेखामध्ये हा फोटो वापरल्याचे आढळले. Jallianwala Bagh Massacre 1919 And Its After Effects In Kasur असे या लेखाचे नाव आहे. यामध्ये चाबकाने मारतानाचा फोटो कसूर रेल्वेस्टेशनवरील असल्याचे म्हटले आहे. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर 1919 मध्ये हा फोटो काढण्यात आला होता. कसूर हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. हा फोटो ज्या जागेवर काढला होता त्या जागेचा 2019 मधील फोटोदेखील यात दिसतो.

मूळ लेख येथे वाचा – स्लाईडशेयर

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता बेंजमिन हॉर्निमन यांनी लिहिलेल्या Amritsar And Our Duty To India (1920) या पुस्तकात हा फोटो सर्वप्रथम छापल्याचे आढळले. पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 120 वरती हा फोटो दिलेला आहे. सोबत कॅप्शन दिले की, कसूर रेल्वेस्टेशनवर एका शिडीला बांधलेल्या तरुणाला चाबकाने मारतानाचा इंग्रज. हॉर्निमन यांचे हे पुस्तक 1920 साली प्रसिद्ध झाले होते. 

मूळ पुस्तक येथे पाहा – अर्काइव्ह

भगतसिंग यांचा जन्म 1907 साली झाला होता. म्हणजे या फोटोच्या वेळी ते 12-13 वर्षांचे होते. त्यावेळी लाहोर येथे त्यांचे शालेय शिक्षण सुरू होते. या फोटोतील शीख तरुण हा शाळकरी मुलगा दिसत नाही. तसेच हॉर्निमन यांच्य पुस्तकात भगतसिंग यांचा उल्लेख नाही. हा तरुण कोण होता याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, इंग्रजी अधिकारी चाबकाने मारतानाचा हा फोटो शहीद भगतसिंग यांचा नाही. त्यांच्या नावे असंबंधित फोटो शेयर केला जात आहे.

Avatar

Title:भगतसिंग यांना चाबकाने फटके मारतानाचा हा फोटो नाही; वाचा त्या फोटोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •