तथ्य पडताळणीः युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला सर्वोत्तम घोषित केलेले नाही

False राष्ट्रीय

(Image is for representation purpose only. Source: Time Magazine)

एका युजरने फॅक्ट क्रेसेंडोला पाठवलेल्या व्हॉटस्अप मेसेजमध्ये भारताच्या “जन गण मन” राष्ट्रगीताला युनेस्कोने जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून निवड केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी करण्याचे ठरविले.

आम्ही फेसबुकवर जेव्हा यासंबंधी शोध घेतला असता अशा आशयाच्या अनेक पोस्ट आढळल्या. पुणेरी पाट्या फेसबुक पेजने युनेस्कोने “जन गण मन” हे सर्वोत्तम राष्ट्रगीत घोषित केल्याची पोस्ट केली होती. इतरही अनेक युजर्सने अशा पोस्ट केल्या आहेत.

अर्काइव्ह

इंग्रजी भाषेतूनही हा मेसेज व्हायरल होत आहे.

तथ्य पडताळणी

मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारतासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले राष्ट्रगीत….!! भारतीयांचा श्वास बनलेल्या “जन गण मन” या राष्ट्रीय गीताची दुसऱ्या कशाबरोबर तुलनाच होऊ शकत नाही ,काही दिवसांपुर्वीच युनेस्कोने या गीतास जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून गौरविले याचा मला सार्थ अभिमान वाटतो….!!! या गीताची निर्मिती नोबेल पुरस्कार विजेते भारतीय साहित्यिक रवीँद्रनाथ टागोर यांनी संस्कृतप्रचूर बंगालीत जन गण मनहे काव्य रचुन केली होती. ऑगस्ट १९४६ मध्ये राष्ट्रसंघात या गीताचे गायन झाले. २४ जानेवारी १९५० मध्ये घटना समितीत जन गण मनगीतास राष्ट्रगीत म्हणुन स्विकारण्यात आले, मूळ गीताची पाच कडवी ;त्यातील पहिले कडवे राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारले. या गीताचे इंग्रजी भाषांतरही रवीँद्रनाथांनीच केले….!!! या अशा महान गीतास आणी त्याच्या निर्माण कर्त्यास त्रिवार वंदन….!!!

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत दिसून आले की, हा मेसेज गेल्या एक दशकापासून फिरत आहे. अनेकांनी याला खरं मानून सोशल मीडियावर शेयर केले आहे. अगदी 2011 पासून फेसबुकवर अशा तऱ्हेच्या पोस्ट फिरत आहे.

आम्ही युनेस्कोच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील याविषयी शोध घेतला. तेव्हा अशी कोणतीही निवड अथवा घोषणा केल्याचे आढळले नाही.

त्यानंतर गुगलवर यासंबंधी शोध घेतला. तेव्हा इंडिया टुडेने यासंदर्भात 2008 साली बातमी केल्याचे आढळले. त्याकाळी असा दावा करणारा ई-मेल पाठविला जात होता. इंडिया टुडेने युनेस्कोकडे अशा प्रकारच्या दाव्याविषयी खुलासा मागितला होता. त्यांना उत्तर देताना युनेस्कोच्या माहिती विभागाच्या प्रमुख सू विलियम्स यांनी स्पष्ट केले होते की, “भारताचे राष्ट्रगीत जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत असल्याचे वृत्त खोटे आहे. युनेस्कोने अशा प्रकारची कोणतीही निवड केलेली नाही. त्यामुळे अशी घोषणा करण्याचा प्रश्नच नाही.”

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

या बातमीत असेही म्हटले आहे की, या ईमेलमधील फोटोंवर क्लिक केले असता “मुंबई हँग आऊट” या याहू ग्रुपसाईट ओपन होत असे. या ग्रुपवर अधिकाधिक सदस्य जोडण्यासाठी कदाचित हा मेसेज पाठविला जात असल्याची शक्यता येथे वर्तविण्यात आली होती.

आयएफसीएन प्रमाणित फॅक्ट चेकिंग वेबसाईट स्नोप्सने 2016 सालीच या मेसेजची पडताळणी केली होती. यामध्येदेखील इंडिया टुडेच्या वरील बातमीचा दाखला देण्यात आला आहे. याचबरोबरच फॅक्टली, न्यूजमोबिल या अन्य आयएफसीएन प्रमाणित वेबसाईटनेदेखील हा दावा खोटा ठरविला आहे.

निष्कर्ष

2008 साली इमेलपासून सुरू झालेली ही अफवा आता व्हॉटसअप मेसेजद्वारे पसरत आहे. तथ्य पडताळणीतून स्पष्ट होते की, युनेस्कोने भारताच्या राष्ट्रगीताला जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून घोषित केले नाही, अशी पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला सर्वोत्तम घोषित केलेले नाही

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False