या फोटोत दिसणारा व्यक्ती पापुआ न्यू गिनी देशाचा राष्ट्रपती नाही. वाचा सत्य काय आहे.

False आंतरराष्ट्रीय | International

जग आधुनिक होत असताना परंपरा नामशेष होण्याविषयी नेहमीच चिंता व्यक्ती केली जाते. खासकरून मूलनिवासी संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास काळजीचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा पारंपरिक मूलनिवासी वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्यक्ती पापुआ न्यू गिनी या देशाचे राष्ट्रपती असल्याचा दावा केला जातो. पाश्चिमात्य देशांच्या सांस्कृतिक आक्रमणासमोर स्वतःच्या देशातील परंपरेला न सोडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये आदिवासी परंपरेतील वस्त्र परिधान केलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेयर केलेला आहे. अर्धनग्नावस्थेतील हा व्यक्ती पापुआ न्यू गिनी देशाचा राष्ट्रपती असल्याचे म्हटले आहे. “हा फोटो पाहून हसू नका, लाजू नका आणि तोंडदेखील विचकू नका. कारण हा व्यक्ती कोणी जंगली नाही. ते तर संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीला उपस्थित असलेले पापुआ न्यू गिनी नामक देशाचे राष्ट्रपती आहेत. आणि एकीकडे आपण आहोत की, आपल्याला घरातसुद्धा स्वतःची भाषा बोलायला आणि पारंपरिक कपडे घालायची लाज वाटते,” असे सोबत लिहिले आहे.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा फोटो गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. विविध सोशल मीडिया वेबसाईट्सवरदेखील हा व्यक्ती पापुआ न्यू गिनी नावाच्या देशाचा राष्ट्रपती असल्याचे म्हटले आहे. परंतु, काही वेबसाईट्सने हा व्यक्ती पापुआचा यूएन प्रतीनिधी असल्याचा उल्लेख केला आहे. आणखी शोध घेतला असता हा फोटो सर्वप्रथम कोणी शेयर केला हे आढळले.

युगांडा देशातील लोकप्रिय वृत्तपत्र रेड पेपरने सर्वप्रथम 18 मे 2017 रोजी फेसबुकवर हा फोटो शेयर केला होता. ती पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. यातील माहितीनुसार, हा व्यक्ती पश्चिम पापुआतील मूलनिवासी आहे. तो स्टार माऊंटेन भागातील Ngalum Uropkulin and Kasipka जमातीचा सदस्य आहे. न्यूयॉर्क येथील यूएन मुख्यालयातील बैठकीला तो उपस्थित होता. पश्चिम पापुआचा प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीला येण्याची ही पहिलीच वेळ होती.

https://www.facebook.com/REDPEPPERUG/photos/a.205919899425957/1691373240880608/?type=3&__xts__%5B0%5D=68.ARCwImVkQjSRdjAh9tCzWb-S7oUnYVUsQSnyslhibh3vzdo_rhlKCfesBZO4BDkeLATqSHEsDuLBZnZVCCvOyM57nT_t7UUiPlXiMtAPAE8-PQZrHD4RWhxG-Q3iVlQmxqEuzGjnFE1RPaMP_5fDCeNTOLBRq2K_a6SUT1ymDoHVuKavDDMSPEucJXjOnXgFUDgvOWgnMZdtaZdPF7sPYFtwFfnkF_vqNwJNFWXpgTD7ngF7zOHLUqtmA2bEKBXoO1OXPQzRezpnlStxdpkHVTrfQWcX6YRnFMtX7y3u-VOxnVapPcQrjfjgzYEawEjpq0TVjLDiFPli6ReeZkqeUIA_pA&__tn__=-R

मूळ पोस्ट येथे पाहा – रेड पेपर

इतर वेबसाईट्सनेदेखील हा व्यक्ती वेस्ट पापुआचा प्रतिनिधी असल्याचे म्हटले आहे. “युएनच्या न्यूयॉर्क मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकीला वेस्ट पापुआचा प्रतिनिधी असा पारंपरिक वेशभूषेत आला होता. लोक काय म्हणतील याचा विचार न करता तो इतर देशांच्या प्रतिनिधींसोबत बसलेला होता,” असे म्हटले आहे. सदरील व्यक्तीने शंखासारखी जी वस्तू परिधान केली आहे तिला Koteka म्हणतात. न्यू गिनी बेटावरील काही आदिवासी जमातीतील पुरुष जननेंद्रिय झाकण्यासाठी ते परिधान करतात.

मूळ बातमी येथे वाचा – Ngyab

वेस्टर्न पापुआ आणि पापुआ न्यू गिनी यातील फरक

न्यू गिनी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे. या बेटाचे दोन भाग पडतात. पूर्वेकडील भागाल पापुआ न्यू गिनी म्हणतात. हा एक स्वतंत्र देश आहे. पश्चिमेकडील भागाल वेस्टर्न न्यू गिनी किंवा वेस्टर्न पापुआ म्हणतात. वेस्टर्न पापुआ हा भाग इंडोनेशिया देशाअंतर्गत येतो. वेस्टर्न पापुआची विभागणी आणखी दोन संस्थानांमध्ये करण्यात आली आहे. यातील एक आहे पापुआ आणि दुसरा वेस्ट पापुआ. व्हायरल फोटोतील व्यक्ती या वेस्ट पापुआ प्रोव्हिन्समधील आहे. खाली दिलेल्या नकाशावरून या बेटाचा भूगोल आणि सीमा लक्षात येतील. 

पापुआ न्यू गिनीमध्ये राष्ट्रपतीपदच नाही

पापुआ न्यू गिनी हा स्वतंत्र देश आहे. या देशाने संसदीय राजेशाही पद्धतीची यंत्रणा स्वीकारलेली आहे. याचा अर्थ असा की, पापुआ न्यू गिनी हा कॉमनवेल्थचा सदस्य असून इंग्लंडची महाराणी या देशाची पदसिद्ध राणी आहे. राणीचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल हे पद या देशामध्ये आहे. पंतप्रधान हा या देशातील सरकारचा प्रमुख असतो. म्हणजे या देशामध्ये राष्ट्रपती हे पदच नाही. त्यामुळे सदरील फोटोतील व्यक्ती पापुआ न्यू गिनीचा राष्ट्रपती असण्याचा प्रश्नच नाही.

मूळ लेख येथे वाचा – Britannica Encyclopedia 

निष्कर्ष

मूलनिवासी पारंपरिक वेशभूषेतील हा व्यक्ती पापुआ न्यू गिनी देशाचा राष्ट्रपती नाही. तो वेस्ट पापुआ बेटाचा युएन प्रतिनिधी आहे. तसेच पापुआ न्यू गिनी देशात राष्ट्रपती हे पदच नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:या फोटोत दिसणारा व्यक्ती पापुआ न्यू गिनी देशाचा राष्ट्रपती नाही. वाचा सत्य काय आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False