
एनएमजेवेब या वेबसाईटवरील एका बातमीमध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान आणि सुहाना खान या तीन स्टार किड्सच्या दिसण्यामध्ये झालेले बदल दाखविले आहेत. बातमीच्या शीर्षकात दावा केला की, सर्जरीनंतर या बॉलिवूड कलाकारांच्या मुलींचे रूप बदलले.

एनएमजेवेबने दिलेली ही बातमी विविध फेसबुक पेजेसने शेयर केली आहे. लेटेस्ट मराठी जोक्स नावाच्या पेजने 19 मार्च रोजी ही बातमी अपलोड केली होती. तसेच आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात आणि मराठी या पेजनेदेखील या बातमीची लिंक शेयर केली आहे. तिन्ही पेजचे मिळून सुमारे 48 लाख फॉलोवर्स आहेत.
बॉलिवूडमध्ये प्लॅस्टिक सर्जरी, नोज जॉब या गोष्टी नवख्या नाही. त्यामुळे कदाचित या श्रीमंत स्टारकन्यांनी चांगले दिसावे म्हणून सर्जरी केली असेल, असा लोकांचा समज झाल्याचे पोस्ट खालील कमेंटमध्ये दिसून येते.
तथ्य पडताळणी
एनएमजेवेबने दिलेल्या बातमीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी, सैफ अली खानची मुलगी सारा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना यांचे जुने आणि नवे फोटो दाखविले आहेत. या फोटोंची तुलना करून या स्टार किड्सच्या लुक्समध्ये आलेले बदल अधोरेखित केले आहेत.
जान्हवी कपूरबद्दल म्हटले की, ती चित्रपटांत पदार्पण करण्यापूर्वी खूप जाड आणि सावळी होती. तसेच सारा अली खानसुद्धा डेब्युपूर्वी खूप जाड होती; पण चित्रपटांमध्ये आल्यावर तिने वजन खूप कमी केले. सुहाना खान अजून चित्रपटांत जरी आली नसली तिचे फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. ती व्होग या प्रतिष्ठित फॅशन मॅगझिनच्या कव्हरवर झळकलेली आहे. बातमीत लिहिले की, “सुहाना आधी सावळी होती. ती खूप लवकर मोठी झाली असे लोकांचे मत आहे.”

मूळ बातमी येथे वाचा – एनएमजेवेब । अर्काइव्ह
या बातमीमध्ये शीर्षक वगळता कुठेही या स्टार किड्सने सर्जरी करून आपला लुक बदलला, असे म्हटलेले नाही. खरंच या मुलींनी सर्जरी केली का, याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.
1. जान्हवी कपूर
जान्हवी कपूरच्या नाकाविषयी इंटरनेटवर अनेकांनी शंका उपस्थित केल्याचे आढळते. इंडिया डॉट कॉमने दिलेल्या बातमीमध्ये जान्हवी कपूरच्या नव्या ग्लॅमरस लुकमध्ये नाकाचा आकार बदलल्याचे म्हटले आहे. यासाठी कदाचित तिने नाकाची सर्जरी केली असावी, असा अंदाज वर्तविला आहे. परंतु, त्यांनी स्पष्टपणे तसे म्हटलेले नाही. तिची आई श्रीदेवी हिनेदेखील कॉस्मेटिक सर्जरी केली असल्याचे म्हटले जाते. मात्र, श्रीदेवीने या वृत्ताला नेहमीच नाकारले.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया । अर्काइव्ह
पीपिंगमूननेदेखील अशी बातमी दिली आहे. मात्र यामध्येसुद्धा जान्हवीने नाकाची सर्जरी केल्याचे बोलले जात आहे, असे म्हटले आहे. म्हणजे थेट दावा केलेला नाही. ही बातमी येथे वाचा – पीपिंगमून । अर्काइव्ह
फ्री प्रेस जर्नलवर देखील जान्हवीच्या नाकाच्या सर्जरीविषयी असणाऱ्या चर्चेची बातमी दिली आहे. कथित प्लॅस्टिक सर्जरीमुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचे बातमीत म्हटले आहे. सविस्तर बातमी येथे वाचा – फ्री प्रेस जर्नल । अर्काइव्ह
2. सारा अली खान
गेल्या वर्षी बद्रीनाथ आणि सिम्बा या दोन चित्रपटांतून झळकलेल्या साराच्या बालपणातील फोटो पाहिले असता, तिच्या सध्याच्या लुकविषयी शंका उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना तिचे वजन 96 किलो होते, असे तिने स्वतः कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितले होते. अभिनेत्री होण्यासाठी तिने मात्र सुमारे 30 किलो वजन कमी केले. त्यासाठी तिने काही सर्जरी नाही तर डाएट आणि व्यायामाद्वारे तिने ही कमाल करून दाखविली.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी खुलासा केला होता. या मुलाखतीचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये सातव्या मिनिटाला ती सांगते, मी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पहिले दोन वर्षे केवळ जंक फूड (पिझ्झा) खायचे. परंतु, जेव्हा मी अभिनेत्री होण्याचे ठरविले तेव्हा वजन कमी करण्याचा मी प्रण केला. तेव्हापासून पिझ्झा वगैरे बंद करून मी हेल्दी डाएट आणि व्यायाम सुरू केला.
टाईम्स नाऊ वेबसाईटने सारा अली खानचा डाएट दिला आहे. यानुसार सारा घरगुती जेवण आणि फायबरयुक्त आहार घेणे पसंत करते. नाष्ट्यामध्ये ती इडली, अंडी, ब्रेड टोस्ट खाते. तिच्या दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, सॅलेड, डाळ, फळं यांचा समावेश असतो. सायंकाळी ती उपमा खाते आणि रात्री केवळ चपाती आणि भाजी असे जेवण करते.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स नाऊ । अर्काइव्ह
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, प्लॅस्टिक सर्जरी करण्याविषयी बोलताना सारा म्हणाली होती की, बॉलिवूडसारख्या ग्लॅमरस जगात दिसण्याला फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे नेहमी सुंदर दिसण्याचे येथे कायमच दबाव असतो. आणि तो दबाव असल्याचे आपल्याला मान्यच करावे लागेल. हाच दबाव झुगारून चांगले दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करण्याऐवजी पौष्टिक आहार आणि व्यायामाचा पर्याय निवडला पाहिजे. आपल्या रंगरुपात प्रत्येकानी समाधानी असावे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
3. सुहाना खान
शाहरुख खानची मुलगी म्हणून सुहाना कायमच चर्चेत असते. मात्र, गेल्या वर्षी व्होग मॅगझीनच्या कव्हरवर झळकल्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. 18 वर्षीय सुहाना सध्या लंडनमधील एका खासमी बोर्डिंग शाळेत शिक्षण घेत आहे.

मूळ कव्हर स्टोरी येथे वाचा – व्होग इंडिया । अर्काइव्ह
तिचे आधीचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले असता तिच्या लुकमध्ये बदल झाल्याचे दिसते. खुद्द शाहरुख खानने गेल्या वर्षी कोलकाता फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी सुहानाला सावळी म्हटले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना शाहरूख म्हणाला होता की, “मी कोणताही अवास्तव दावा करत नाही. मी स्वतः काही जगातील सर्वात देखणा माणूस नाही. त्यामुळे इतरांना रंगरुपावरून मी कमी लेखत नाही. प्रामाणिकपणाने सांगायचे तर माझी स्वतःची मुलगी सावळी आहे. माझ्यासाठी सर्वात सुंदर मुलगी आहे.” मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह
निष्कर्ष
एनएमजेवेबने दिलेल्या बातमीचे शीर्षक वाचकांना चुकीची माहिती देते. बातमीत कुठेही सर्जरीचा उल्लेख नाही. तसेच या तिन्ही मुलींना सर्जरी केल्याचे तपासणीतून आढळले नाही. त्यामुळे ही बातमी असत्य शीर्षक असणारी आहे.

Title:खरंच जान्हवी, सारा, सुहाना यांनी सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली? जाणून घ्या सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False Headline
