
सोशल मीडियावर सध्या “डान्सिंग” शिक्षक दाम्पत्याच्या व्हिडियोने धुमाकूळ घातलेला आहे. “गोमू संगतीने” या लोकप्रिय मराठी गाण्यावर एका शिक्षक जोडगळीने मनसोक्त ठेका धरला आहे. या व्हिडियोवर अनेकांनी कौतुकाच्या वर्षाव केला. मात्र, या व्हिडियोबाबत विविध दावे देखील केले जात आहेत. विविध फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले जातेय की, अनेक वर्षे वेगळे काम केल्यानंतर या शिक्षक दाम्पत्याची बदली यंदा एकाच शाळेत झाली. याचा आनंद त्यांनी असा नाचून साजरा केला. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । रेकॉर्ड केलेला व्हिडियो येथे पाहा – अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल इन महाराष्ट्र नावाच्या फेसबुक पेजने 18 जून रोजी हा व्हिडियो शेयर केला होता. यामध्ये एक शिक्षक आणि शिक्षका “गोमू संगतीने” या गाण्यावर नृत्य करताना दिसतात. एकुण 2.50 मिनिटांच्या व्हिडियोला कॅप्शन दिले की, खूप दिवसांनी एकाच शाळेवर बदली झाल्याने आनंद व्यक्त करतांना शिक्षक दांपत्य. याच दाव्यासह अनेकांनी हा व्हिडियो शेयर केला. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
तथ्य पडताळणी
हा व्हिडियो नेमका कुठला आहे, त्यामध्ये नृत्य करणारे शिक्षक-शिक्षिका कोण, हा व्हिडियो तयार करण्याचे प्रयोजन काय याबाबत व्हायरल पोस्टमध्ये काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे व्हिडियोची सतत्या पडताळणी करणे गरजेचे आहे. हा व्हिडियो व्हॉटसअॅपवरदेखील प्रचंड फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने राज्यभरातील विविध जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षक संघटनांशी संपर्क केला. परंतु, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.
व्हिडियोखालील कमेंट्सची सखोल तपासणी केली असता सुनील सावंत यांचे एक कमेंट आढळले. त्यात त्यांनी लिहिले की, हा व्हिडियो बीएड क्लासमेटसच्या स्नेहसंमेलनातील आहे. व्हिडियोतील शिक्षकाचे नाव नरुटे सर असून, हे दाम्पत्य महाबळेश्वर येथील आहे. हा धागा पकडून मग सातारा-महाबळेश्वर भागात तपास सुरू केला. तेथील विविध शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद शाळा, आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला.
एका पत्रकाराने माहिती घेऊन सांगितले की, लक्ष्मण आणि पद्मजा नरुटे असे या शिक्षक दाम्पत्याचे नाव आहे. शिक्षकांचे नाव मिळाल्यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने लक्ष्मण नरुटे आणि पद्मजा नरुटे यांच्या संपर्क केला. त्यांना व्हिडियोविषयीच्या दाव्याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी तो दावा खोटा असल्याचे सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोला मग त्यांनी या व्हिडियो मागची खरी कहाणी सांगितली.
खरं काय आहे?
लक्ष्मण आणि पद्मजा नरुटे हे दोघे प्राथमिक शिक्षक आहेत. ते लोणंद (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे राहतात. लक्ष्मण नरुटे सध्या मानवली अहिरे येथील जिल्हा परिषद शाळेवर, तर पद्मजा कासरुड जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी दोघांनीदेखील सध्या यशवंतराव चव्हाम मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. कोर्सला प्रवेश घेतलेला आहे. त्यांच्या बी.एड. बॅचचे नुकतेच द्वितीय वर्ष सुरू झाले.

साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे 8 जूनला त्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोर्स वर्क म्हणून यावेळी एक सांस्कृतिक कार्यक्रमदेखील घेण्यात आला. यामध्ये नरुटे दाम्पत्याने कला सादरीकरणामध्ये “गोमू संगतीने” या गाण्यावर नृत्य केले. त्यांच्या मित्राने हा व्हिडियो तयार केला होता.
“मी या कार्यक्रमात कविता वाचनदेखील केले. माझा नृत्याचा पिंड नसला तरी, कार्यक्रमाचा एक भाग आणि कला म्हणून मी नृत्य केले. याचा व्हिडियो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राज्यभरातून आम्हाला फोन आले. अनेकांनी कौतुक केले. आमच्या नृत्याची स्तुती केली. व्हिडियोला मिळालेला हा अनपेक्षित प्रतिसाद सुखावणारा होता,” असे नरुटे दाम्पत्याने सांगितले.
व्हिडियोच्या खोट्या दाव्याविषयी त्यांनी सांगितले की, काही लोकांनी चुकीची माहिती देऊन हा व्हिडियो शेयर केला. त्यावरून थोड्या नकारात्मक प्रतिक्रियादेखील उमटल्या. पण, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आमची बदली एकाच शाळेत झाली म्हणून आम्ही नाचलो नव्हतो. तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग होता. तसेच हा शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रमही नव्हता.
विशेष म्हणजे 8 जून रोजी लक्ष्मण यांनी हा व्हिडियो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेयर केला होता. परंतु, वाढता प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून त्यांनी 9 जून रोजी तो फेसबुकवरून डिलीट केला. पण तोपर्यंत हा व्हिडियो सगळीकडे पसरला होता. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये नरुटे दाम्पत्य या व्हिडियोची खरी कहाणी सांगत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन संस्थेशीदेखील संपर्क साधला. 8 जून रोजी तेथे असा कार्यक्रम झाला होता असे सांगितले.
निष्कर्ष
एकाच शाळेत बदली झाली म्हणून व्हायरल व्हिडियोतील शिक्षक दाम्पत्याने नाचून आनंद केला नव्हता. या दाम्पत्याचे नाव लक्ष्मण आणि पद्मजा नरुटे असून, त्यांनी बी.एड. प्रशिक्षणादरम्यान एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हे नृत्य सादर केले होते. त्यामुळे बदली झाली म्हणून डान्स केल्याचा दावा खोटा आहे.

Title:VIDEO: एकाच शाळेवर बदली झाल्यामुळे या शिक्षक दाम्पत्याने नाचून आनंद साजरा केला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
