
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट तयार केल्याने शिवसेना नेमकी कोणाची यावरून संग्राम सुरू आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक निशाणी वापरण्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “वेळ पडली तर शिवसेना पुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर लढवणार”, असे संजय राऊत म्हणाले. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राचा लोगो असलेल्या या विधानाचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, संजय राऊत यांनी असे विधान केलेले नाही. ‘लोकसत्ता’चा लोगो वापरून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
काय आहे दावा?
संजय राऊत यांचा फोटो आणि ‘लोकसत्ता’च्या सोशल मीडिया फॉरमॅटमधील पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार! – संजय राऊत.”

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम । इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
संजय राऊत यांनी असे विधान केले असते तर ही नक्कीच बातमी ठरली असती. परंतु, एकाही वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने याविषयी बातमी केलेली नाही.
‘लोकसत्ता’च्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरदेखील सदील व्हायरल विधानाचा स्क्रीनशॉट उपलब्ध नाही.
‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर या फोटोशी मिळताजुळता फोटो आढळला. परंतु, यामध्ये वेगळे विधान दिसते. “जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो, तो पाने के लिए बहुत कुछ होता है!” असे संजय राऊत म्हणाले होते.

मूळ पोस्ट – फेसबुक
फॅक्ट क्रेसेंडोने ‘लोकसत्ता’शी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला या व्हायरल स्क्रीनशॉटविषयी प्रसिद्ध केलेला खुलासा पाठवला.
“मूळ कार्डमधील मजकूराऐवजी खोडकर आणि दिशाभूल करणारा मजकूर, लोगो आणि इतर गोष्टी आहेत तशाच ठेऊन बदलून ही पोस्ट व्हायरल होत आहे,” असे लोकसत्ताने म्हटले आहे. “सर्व वाचकांना विनंती आहे की अशाप्रकारचा मजकूर सोशल मीडियावर शेअर करु नये. एखादी संस्था अथवा व्यक्तीच्या नावाने खोटा मजकूर प्रसारित करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा आहे. असे मॉर्फ आणि एडिटेड फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळेच सोशल मीडियावर अशाप्रकारचे कार्ड आणि पोस्ट शेअर करताना सत्यता पडताळून त्या शेअर कराव्यात.”

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रावादीच्या निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केलेले नाही. लोकसत्ताच्या नावाने खोडसाळ पोस्ट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:वेळ पडली तर शिवसेना राष्ट्रवादीच्या निशाणीवर निवडणूक लढवणार, असे संजय राऊत म्हणाले नाही
Fact Check By: Agastya DeokarResult: False
