
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने शेकडो ट्विटर अकाउंट तयार झाले आहेत. त्यापैकी काही अकाउंटला तर हजारो फॉलोवर्स जोडले गेले आहेत.
‘DroupadiMurmu__’ यूजरनेम असणाऱ्या अकाउंटला तर सध्या 72 हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यातले 50 हजार फॉलोवर्स तर केवळ मागच्या सहा दिवसांत वाढले आहेत. भाजपचे अनेक आमदार, खासदार, न्यूज मीडिया आणि पत्रकार या अकाउंटला मुर्मू यांचे खरे अकाउंट समजून टॅग करत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या संशोधनात मात्र हे बनावट अकाउंट असल्याचे सिद्ध झाले. मुर्मू यांच्या नावाने हे खोटे अकाउंट चालविण्यात येत आहे.
मुर्मू यांचे फेक अकाउंट
भाजपचे आमदार महेशकुमार रावल, निमिशाबेन सुतार, शैलेश मेहता, पंकजकुमार देसाई, जगदीश विश्वकर्मा, आणि हर्ष संघवी; भाजपचे खासदार रामभाई मोकारिया, अरुण साओ; भाजप आयटी सेलचे सदस्य लोकेंद्र पराशर, देवांग दवे मुर्मू यांचे अकाउंट म्हणून ‘DroupadiMurmu__’ या अकाउंटला टॅग करीत आहेत.
एवढेच नाही तर लाईव्ह लॉ, गुजरात आकाशवाणी, बीबीसी मराठी, ईटी नाऊ Now अशा अनेक चॅनलनेसुद्धा या अकाउंटला टॅग केलेले आहे.
या अकाउंटवरून मुर्मू यांच्या नावाने काही शंका येणाऱ्या पोस्टसुद्धा शेअर करण्यात येत आहेत.

तथ्य पडताळणी
सदरील अकाउंटची नीट तपासणी केली असता कळते की, ते व्हेरिफाई नाही – म्हणजेच ब्लू टिक नाही. मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीचे अकाउंट व्हेरिफाईड नसणे ही संशय उत्पन्न करण्यासारखी गोष्ट आहे.
या अकाउंटबद्दल दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत –
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मुर्मू यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना त्यांचे ट्विटर अकाउंटर टॅग केलेले नाही.
2. हे अकाउंट जुलै 2017 रोजी तयार झालेले आहे. परंतु, या अकाउंवरून सर्वात जुने ट्विट 23 जून 2022 रोजीचे आहे. म्हणजे त्याआधी पाचवर्षे या अकाउंटवरून एकही ट्विट करण्यात आले नाही का?

मग या अकाउंटचा इतिहास काय सांगतो?
ट्विटरवर जेव्हा आपण अकाउंट उघडतो तेव्हा अकाउंटला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्याला ट्विटर आयडी (Twitter ID) किंवा यूजर आयडी (User ID) म्हणातात.
आपण आपल्या अकाउंटचे हँडलनेम कितीही वेळा बदलू शकतो; परंतु, ट्विटर आयडी कायम तोच राहतो. तो बदलत नाही. ट्विटर आयडी तुम्ही येथे तपासू शकता.
‘@DroupadiMurmu__’ या अकाउंटचा ट्विटर आयडी आहे – 886647907537080321.
गुगलवर हा क्रमांक शोधल्यावर गिटहब वेबसाईटवरील एका डेटाबेसमध्ये या क्रमांकाशी निगडित ‘@imkjtiwari’ हे यूजरनेम आढळले.
ट्विटरवर हे यूजरनेम सर्च केले. जितेंद्र नावाच्या (@JasvarJitendra) एका व्यक्तीने 2019 मध्ये @imkjtiwari अकाउंटच्या एका ट्विटला रिप्लाय केला होता. जसे की, तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, @imkjtiwari या अकाउंच्या जागेवर ‘@DroupadiMurmu__’ दिसते.

मग ‘@imkjtiwari’ आणि ‘@DroupadiMurmu__’ हे दोन्ही अकाउंट एकच आहेत का?
हे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा दोन्ही अकाउंटचा ट्विटर आयडी सारखाच असेल.
त्यासाठी आम्ही ट्विटर एपीआयची मदत घेतली. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की, जितेंद्र नावाच्या यूजरने ज्या अकाउंटच्या ट्विटला रिप्लाय दिला होता, त्या @imkjtiwari अकाउंटचा ट्विटर आयडी 886647907537080321 आहे.
आणि जसे की आपल्याला माहिती आहे, ‘@DroupadiMurmu__’ अकाउंटचा ट्विटर आयडीसुद्धा 886647907537080321 आहे.

2017 साली हेच अकाउंट ‘@kajjlam’ नावाने चालविले जायचे. या नावाला ट्विटर वर सर्च केल्यावर बऱ्याच लोकांनी त्याला रिप्लाय देताना ‘काजल’ असे म्हटले आहे.
रुपाराम नावाच्या यूजरने 27 डिसेंबर 2017 रोजी ‘Hi Kajal’ असा रिप्लाय केला होता. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, ‘@kajjlam’ या अकाउंच्या जागेवर ‘@DroupadiMurmu__’ दिसते.

या अकाउंटचीसुद्धा आम्ही ट्विटर एपीआयच्या मदतीने तपासणी केली. तेव्हा कळाले की, ‘@kajjlam’ अकाउंटचा ट्विटर आयडी 886647907537080321 आहे. तोच क्रमांक ‘@DroupadiMurmu__’ या अकाउंटचासुद्धा आहे.

यावरून कळते की, अनेक वेळा या अकाउंटचे नाव बदलले आहे. शिवाय या अकाउंटवरून 2017 आणि 2019 मध्येसुद्धा ट्विट करण्यात आले होते. परंतु, आता ते डिलीट करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदींनी मुर्मू यांच्या नावाची घोषणा 21 जून रोजी केली. आणि त्या तारखेनंतरचेच ट्विट आता या अकाउंटवर उपलब्ध आहे.
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तीन्ही अकाउंटचा ट्विटर आयडी एकच आहे.
Username | Twitter ID | Year |
@kajjlam | 886647907537080321 | 2017 |
@imkjtiwari | 886647907537080321 | 2019 |
@DroupadiMurmu__ | 886647907537080321 | 2022 |
मुर्मू यांचे कोणतेही अकाउंट नाही
द्रौपदी मुर्मू यांचे ट्विटर किंवा अन्य सोशल मीडिया वेबसाईटवर अकाउंट नाही. त्यांच्या नावे खोटे अकाउंट उघडणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुर्मू यांचे खासगी सहाय्यक सुरज कुमार महातो यांनी इंडिया टुडेला माहिती दिली की, मुर्मू यांच्या नावे अनेक फेक अकाउंट तयार करण्यात आले आहेत. त्या सोशल मीडियावर नाहीत.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, मुर्मू यांच्या नावाने बनावट अकाउंट चालविण्यात येत आहे. ‘@DroupadiMurmu__’ हे मुर्मू यांचे अधिकृत अकाउंट नाही.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:दौपदी मुर्मू यांचे फेक ट्विटर अकाउंट व्हायरल; भाजप आमदार, खासदार, मीडिया करत आहे त्याला टॅग
Fact Check By: Agastya DeokarResult: False
