ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False नैसर्गिक आपत्ती

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर तर ओसंडून वाहणाऱ्या नद्या, वस्त्यांमध्ये साचलेले पाणी, दरड कोसळण्याचे व्हिडिओंचा पूर आलेला आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये महिला वाहून गेल्याची घटना शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील अक्सा बीच (Aksa Beach) येथे घडलेल्या घटनेचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अक्सा बीचवरील नाही. ही तर ओमान देशात घडलेली घटना आहे.

काय आहे दावा?

25 सेकंदाच्या क्लिपमध्ये लोक उसळणाऱ्या लाटांजवळ उभे दिसतात. एक उंच लाट किनाऱ्यावर धडकल्यामुळे काही महिला परतणाऱ्या प्रवाहासह समुद्रात वाहून जातात. 

हा व्हिडिओ अक्सा बीच, मलाड, मुंबईचा म्हणून शेअर होत आहे.

तथ्य पडताळणी

या घटनेविषयी कीवर्ड सर्च केल्यावर टाईम्स ऑफ इंडियाची बातमी आढळली. 12 जुलै रोजी प्रकाशित या बातमीनुसार, हा व्हिडिओ ओमान देशातील आहे. 

तेथील सलालह अल मुघसैल किनाऱ्यावर आठ भारतीय नागरिक समुद्रात वाहून गेले होते. सुरक्षा रेषेपलिकडे लाटांच्या अगदी जवळ गेल्याने ही घटन घडली. एकुण तीन लोकांना वाचविण्यात यश आले असून, इतर पाच जणांचा शोध सुरू असल्याचे बातमीत म्हटले आहे.

डीएनएच्या बातमीनुसार, या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शशिकांत म्हामणे आणि त्यांचा सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्यांची मुलगी अद्याप सापडली नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 

मूळ सांगली जिल्ह्यातील शशिकांत म्हामणे पत्नी व दोन मुलांसह – श्रेया (9) व श्रेयस (6) – दुबईत राहतात. एक दिवसाच्या सुट्टीसाठी ते ओमानला पर्यटनासाठी गेली होते.

वेदर ओमान नावाच्या ट्विटर अकाउंटवरून 11 जुलै रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. अल मुघसैल बीचवरील सुरक्षा कठडा ओलांडून किनाऱ्याजवळ गेल्याने जोरदार लाटांमुळे पर्यटक पाण्यात ओढले गेल्याचे यात म्हटल आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, लाटांमध्ये पर्यटक वाहून गेल्याचा हा व्हिडिओ अक्सा बीचवरील नाही. ही घटना ओमानमध्ये घडली होती. आठ भारतीय पर्यटक पाण्यात वाहून गेले होते.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False