FACT CHECK: सलमान खानने खरंच रानू मंडल यांना 55 लाखांचे घर गिफ्ट दिले का?

False सामाजिक

सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या चर्चेत आहेत. रेल्वे स्टेशनवर गातानाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशामिया यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड केले, अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यांचा हा स्वप्नवत प्रवास सर्वांनाच भुरळ घालत आहे.

सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, रानू मंडल यांच्या सुरेल आवाजाने प्रभावित होऊन सलमानने त्यांना राहण्यासाठी 55 लाखांचे घर दिले. एवढेच नाही तर त्याच्या आगामी ‘दबंग 3’ चित्रपटात एक गाणं गाण्याचीही ऑफर दिली. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले आहे की, सलमान खानला जेव्हा कळाले की, रानू मंडल यांच्याकडे राहायला घर नाही तेव्हा त्याने मुंबईत 55 लाखांचे घर त्यांना गिफ्ट दिले. तसेच आगामी ‘दबंग 3’ चित्रपटात एक गाणे गाण्याची ऑफरसुद्धा दिली.

कोण आहेत रानू मंडल?

रानू या मुळच्या मुंबईतील आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. कोलकाताच्या रानाघाट स्टेशनवर त्यांना अतिंद्र चक्रवर्ती हा तरुण भेटला. पेशाने इंजीनिअर असलेल्या अतिंद्रने रानू यांचा सुरेल आवाज ऐकला आणि त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि रोतोरात व्हायरल झाला. अधिक येथे वाचा – लोकसत्ता

तथ्य पडताळणी

सलमान खान त्याच्या मोठ्या मनासाठी जाणला जातो. बॉलिवूडमधील अनेक जणांना तो मदत करीत असतो. मग त्याने यावेळी रानू मंडल यांनासुद्धा घर गिफ्ट दिले का? याचा तपास घेतला असता वेगळीच माहिती समोर आली. 

फ्री प्रेस जर्नलने 29 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या बातमीनुसार, सलमान खानने रानू मंडल यांना घर गिफ्ट दिल्याच्या वावड्या उठल्यानंतर त्याच्या जवळील सुत्रांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. सलमानने 55 लाख रुपये किंमतीचे घर गिफ्ट दिलेले नाही, असे सलमानच्या जवळील सुत्रांच्या आधारे बातमीत सांगितले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फ्री पोस्ट जर्नलअर्काइव्ह

टाईम्स ऑफ इंडियानेसुद्धा या बातमीचे खंडन केले आहे. 28 ऑगस्टच्या बातमीनुसार, सलमानने घर गिफ्ट दिलेले नाही. तसेच ‘दबंग 3’मध्येसुद्धा रानू मंडल यांना गाण्याची ऑफर दिलेली नाही. सोशल मीडियावरील दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे सलमनाच्या जवळच्या सुत्रांनी सिंगतले.

मूळ बातमी येथे पाहा – टाईम्स ऑफ इंडिया 

फॅक्ट क्रेसेंडोने मग सलमान खानचे मीडिया मॅनेजर जॉर्डी यांच्याशी संपर्क साधाला. रानू मंडलला घर गिफ्ट दिल्याचे वृत्त साफ खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. “सलमान खान यांनी रानू मंडल यांना 55 लाख रुपयांचे घर गिफ्ट दिलेली नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे श्री. जॉर्डी म्हणाले.

दरम्यान, रानू मंडलचा व्हिडियो व्हायरल करणाऱ्या आणि आता तिचा मॅनेजर असलेल्या अतिंद्र चक्रवती यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानने घर दिल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “ही अफवा पसरल्यानंतर मला खूप जणांचे फोन आले. पण असे काही झालेले नाही. सलमान खानने रानू यांना घर गिफ्ट दिलेले नाही. खर तर रानाघाट येथील स्थानिक प्रशासनातर्फे त्यांच्यासाठी घर बांधण्यात येत आहे. त्यांनीच त्यांचे आधार कार्ड तयार करण्यात मदती केली.

मूळ मुलाखत येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स । अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रानू मंडल यांना 55 लाखांचे घर गिफ्ट दिल्याची बातमी खोटी आहे. त्याने तसे काही केलेले नाही. तसेच रानू यांना आगामी ‘दबंग 3’मध्ये  गाणे गाण्याचीसुद्धा ऑफर दिलेली नाही. सलमान खानचे मीडिया मॅनेजर जॉर्डी आणि रानू मंडल यांचा मॅनेजर अतिंद्र चक्रवर्ती यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. रानू मंडल यांना राणाघाट स्थानिक प्रशासनातर्फे घर देण्यात येत आहे.

Avatar

Title:FACT CHECK: सलमान खानने खरंच रानू मंडल यांना 55 लाखांचे घर गिफ्ट दिले का?

Fact Check By: Aagstya Deokar 

Result: False