
‘गुजरात फाईल्स’च्या लेखिका आणि शोधपत्रकार राणा अय्यूब यांनी बाल गुन्हेगारांच्या बाजूने वादग्रस्त विधान केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पत्रकार राणा अय्यूब यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेलो. या ठिकाणी राणा अय्यूब यांनी आपण बाल गुन्हेगारांबद्दल कोणतेही विधान केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले असल्याचे दिसून येते.
त्यानंतर आम्ही पत्रकार राणा अय्यूब यांनी बालगुन्हेगारांबद्दल कधी आणि काय वक्तव्य केले आहे. हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डेली ओ ने याबाबत दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले.
डेली ओ ने 26 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या वृत्तात एका खोट्या पोस्टविषयी माहिती देण्यात आली आहे. राणा अय्युब यांनी तेव्हाही आपण बाल गुन्हेगारांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी फोटोत राणा अय्युब यांच्या नावाने बनावट ट्विट दर्शविणारे अकाऊंटही अस्तित्वात नसल्याचे डेली ओच्या वृत्तात म्हटले होते.
पत्रकार राणा अय्यूब यांना होणाऱ्या या बनावट गोष्टींच्या त्रासाबद्दल त्यांचा एक व्हिडिओही आम्हाला यूटुयूबवर दिसून आला.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने राणा अय्यूब यांना संरक्षण द्यावे, असे भारत सरकारला सांगितल्याचे तसेच त्यांना मिळणाऱ्या धमक्या आणि डिजिटल माध्यमातून त्यांची होणारी बदनामी याविषयी बीबीसीने 17 जून 2018 रोजी एक वृत्त दिल्याचे दिसून येते.
बीबीसीचे सविस्तर वृत्त/ Archive
निष्कर्ष
पत्रकार राणा अय्यूब यांनी बाल गुन्हेगारांचे समर्थन करणारे कोणतेही ट्विट अथवा वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने त्यांना मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेत त्यांना सुरक्षा पुरविण्याविषयी भारत सरकारला सांगितले आहे. राणा अय्यूब यांनी स्वत:ही डिजिटल माध्यमातून आपल्या होणाऱ्या बदनामीविषयी माहिती दिली असून आवाज उठवला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : पत्रकार राणा अय्यूब बाल गुन्हेगारांच्या बाजूने केले वादग्रस्त विधान?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
