TRAFFIC FINE FACT: ट्रॅफिक पोलिसांना 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम न घेण्याचा नियम आहे का?

False सामाजिक

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनुसार, वाहतूक पोलिसांना शंभर रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही. तसा नियमच असल्याचे पोस्टमध्ये दावा केला आहे. वाहतूकीचे विविध नियम तोडल्यास केवळ 100 रुपयेच दंड असल्याचे यामध्ये म्हटले आहे. आतापर्यंत 1700 वेळा शेयर झालेल्या या पोस्टमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांनी या पोस्टमधील माहितीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात सत्य पडताळणी केली की, खरंच टॅफिक पोलिसांना 100 रुपयांपेक्षा जास्त दंड न घेण्याचा काही नियम आहे का?

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

ट्रॅफिक पोलिसांना 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम नियमानुसार घेता येत नाही! मोटर वेहिकल अ‍ॅक्टनुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड फक्त 100 रुपयेच आहे. 100 रुपयांपेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यास थेट पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांच्याकडे तक्रार करा.

वाहतूक सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगसमोर गाडी उभी करणे, विना परवाना, विना कागदपत्रे, वेग मर्यादा ओलांडणे, काचेला काळी फिल्म लावणे, नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणे आदी नियम उल्लंघन केल्यावर फक्त 100 रुपये दंड असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. पुरावा म्हणून माहितीचा अधिकार वापरून मिळवलेली नियम व दंडाची माहिती दिली आहे.

तथ्य पडताळणी

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यावर आकरण्यात येणारी दंडाची रक्कम मोटार वाहन अधिनियम (1988) आणि राज्य व शहर वाहतूक पोलिसांनुसार ठरविण्यात येते. 2016 साली केंद्रीय कॅबिनेटने कायद्यात सुधार करून देशभरातील वाहतूक दंड वाढविण्यास परवानगी दिली होती.

महाराष्ट्र मोटर वाहन नियम (1989), महाराष्ट्र महामार्ग पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार पोस्टमध्ये दिलेल्या प्रत्येक नियम उल्लंघनाचा दंड किती हे तपासले.

1. विना परवाना (Without License)

नियमानुसार महाराष्ट्रात विना परवाना गाडी चालविल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येतो. त्यासाठी मोटर वाहन अधिनियमातील सेक्शन 3 (1) 181 लागू होतो. त्याचबरोबर 16 वर्षांखालील ड्राईव्हर विना परवाना गाडी चालवत असेल तर 500 रुपये, विना परवाना गाडी चालू दिल्याबद्दल वाहन मालकाला 500 रुपये दंड लावण्यात येतो.

2. गाडीची कागदपत्रे सोबत न बाळगणे

गाडीची नोंदणी आणि इतर कागदपत्रे सोबत नसतील तर वाहतूक पोलीस तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड लावू शकता. त्यामध्ये नोंदणी नसलेली गाडी चालविणाऱ्या चालकाला 1000 रुपये दंड, गाडी मालकाला 1000 रुपये दंड, दुचाकी वगळता इतर नोंदणी नसलेले वाहन असल्यास 2000 रुपयांचे दंड आकारण्याची तरतुद आहे.

3. झेब्रा क्रॉसिंगसमोर गाडी उभी करणे

सिग्नल जवळील पांढऱ्या-काळ्या पट्टीच्या समोर गाडी उभी/थांबविल्यास ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडून 200 रुपये वसूल करू शकतात. त्यासाठी मोटर वाहन अधिनियमातील सेक्शन 177 लागू होतो.

4. वाहतूक सिग्नल तोडणे

सिग्नल तोडल्यास नियमानुसार दोनशे रुपये दंड आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या सिग्नलकडे दुर्लक्ष किंवा उल्लंघन केल्यास 200 रुपये आणि पोलिसांचा आदेश न मानल्यास 500 रुपये दंड आकरण्यात येतो.

5. वेग मर्यादा

वेग मर्यादा पाळणे अपघात टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे ट्रॅफिकच्या नियमांमध्ये वेगावर विशेष ध्यान देण्यात आले आहे. नियमानुसार, रेसिंग करण्यासाठी अधिक वेगाने वाहन चालविल्यास दोन हजार रुपयांचा दंड तुम्हाला बसू शकतो. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी पळविल्यास चालकाला 1000 रुपये दंड बसतो. घातक पद्धतीने गाडी चालविल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येतो.

6. टिंटेड ग्लास

वाहनाच्या काचा काळ्या नसाव्यात, असा नियमच आहे. गाडीची काच ही पारदर्शी असावी. तशी नसल्यास 200 रुपये दंड आणि काचेवरील काळी फिल्म काढण्यात येते. याबरोबरच गाडीला जर मड गार्ड किंवा साईडचे काच नसतील तरीही 200 रुपये दंड लावला जातो.

7. नो पार्किंग

पार्किंगसंदर्भात अनेक नियम आहेत. परवानगी नसलेल्या जागी वाहन उभे केल्यास 200 रुपये दंड लागतो. वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशी गाडी पार्क केल्यावरही दोनशे रुपयांचा दंड बसतो. वळणावर वाहन उभे करणे, पुलावर वाहन उभे करणे यासाठी देखील 200 रुपये दंडाची तरतुद आहे.

निष्कर्ष

अधिकृत नियम तपासल्यावर लक्षात येते की, पोस्टमध्ये उल्लेख केलेले नियम तोडल्यावर 100 रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्यात येतो. वाहतूक नियंत्रण पोलिसांना 100 रुपयांपेक्षा अधिक दंड आकारण्याची परवानगी आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:TRAFFIC FINE FACT: ट्रॅफिक पोलिसांना 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम न घेण्याचा नियम आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False