फॅक्ट चेक : वाहतूकीच्या दंडावरुन पोलिसांसोबत या महिलेचा वाद झाला का?

False सामाजिक

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करुन सरकारने पोलिसांना गुंड बनवले आहे. एका निरागस लहान मुलासमोर त्याच्या वडिलांना मारण्यात येत आहे. हा संदेश अन्य समुहांवरही पाठवा ज्यामुळे प्रशासनाला जाग येईल, अशी माहिती देत एक व्हिडिओ कोकणी व्हॉट्सअप या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. सुरज वाघंबरे यांनीही अशीच माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी

ही घटना नेमकी कुठे घडली याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला न्यूज 18 इंडियाने 17 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्ताचे शीर्षक हिंदीत असून त्याच्या स्वैर मराठी अनुवादानुसार म्हटले आहे की, गाझियाबाद पोलिसांचे गैरवर्तन, पतीला वाचविण्याचा महिलेचा प्रयत्न, पोलिसांनी मारला धक्का. या वृत्तात म्हटले आहे की, ही महिला खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिची पोलिसांसोबत झटापट झाली.

त्यानंतर नवभारत टाईम्स या दैनिकाने 18 ऑक्टोबर 2019 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार गाझियाबाद येथील तुकाबनगरमध्ये करवाचौथ या सणासाठी मध्यरात्री एकच्या सुमारास ही महिला मेहंदी लावण्यासाठी आली होती. त्यावेळी पोलिसांसोबत तिचा वाद झाला.

image2.png

Archive

याबाबत अधिक माहितीसाठी फॅक्ट क्रेसेंडोने गाझियाबादचे पोलीस अधिक्षक नीरज कुमार जादौन यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, ही घटना गाझियाबादमध्ये घडली असून जवळपास एक महिना जुनी आहे. ही महिला आपल्या पती समवेत मध्यरात्री 12 ते एकच्या सुमारास मेहंदी लावण्यास आली होती. रात्र अधिक झाली असल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्या मेहंदीवाल्यास दुकान बंद करण्यास सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मध्यरात्री एवढ्या उशिरापर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. या महिलेचा पती नशेत होता. त्याने पोलिसांशी गैरवर्तन केले होते. पोलिसांनी या महिलेच्या पतीस ताब्यात घेतल्यावर ती पोलिसांशी भांडू लागली. त्यानंतर तिने पोलीस कर्मचाऱ्यासोबत हाणामारी देखील केली. या पोलीस कर्मचाऱ्यावरही गैरवर्तनाबद्दल कारवाई करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने, खोट्या माहितीसह पसरविण्यात येत आहे. या व्हिडिओचा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारणीचा काहीही संबंध नाही.

याशिवाय आम्हाला गाझियाबाद पोलिसांच्या ट्विटर खात्यावर एक वृत्तनिवेदन दिसून आले. 

Archive

तत्पूर्वी ट्विट करुनही गाझियाबाद पोलिसांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करताना महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. ते आपण खाली पाहू शकता.

Archive

निष्कर्ष 

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडासाठी पोलीस एका व्यक्तीस मारहाण करत असल्याचा या व्हिडिओसोबतचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. या व्हिडिओचा आणि वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:फॅक्ट चेक : वाहतूकीच्या दंडावरुन पोलिसांसोबत या महिलेचा वाद झाला का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False