
भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग डच विद्यार्थ्यांना नेदरलँडमधील शाळांमध्ये इयत्ता 5 वी पासून अनिवार्य करण्यात आले आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत परदेशी विद्यार्थी संस्कृत मंत्रोच्चारण करतानाचा व्हिडियोसुद्धा शेयर केला जातोय. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
नेदरलँडमधील शाळांमध्ये डच विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी पासून खरोखरच भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग अनिवार्य कऱण्यात आले आहेत का, याचा गुगलवर शोध घेतल्यावर अशी कोणतीही बाब आढळली नाही. त्यानंतर नेदरलॅंड सरकारच्या संकेतस्थळावर याबाबत काही माहिती मिळते का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. नेदरलॅंड सरकारच्या संकेतस्थळावरही अशी कोणतीही माहिती आम्हाला आढळून आली नाही.
नेदरलँड सरकारचे संकेतस्थळ / Archive
डच, इंग्रजी, गणित, समाज आणि पर्यावरणविषयक अभ्यास, भूगोल, इतिहास, जीवशास्त्र, रस्ता सुरक्षा, राजकीय अभ्यास, संगीत, चित्रकला, हस्तकला, क्रीडा हे विषय इथे अनिर्वाय असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ कुठला हा प्रश्न मात्र कायम होता. हा व्हिडिओ लंडनच्या सेंट जॉन शाळेचा असल्याचे एबीपी न्यूजने म्हटले आहे. या शाळेत संस्कृत शिकवले जाते. एबीपी न्यूजचा हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
नेदरलॅंड येथील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग अनिवार्य नाहीत. समाजमाध्यमात नेदरलॅंडमधील शाळेचा म्हणून पसरत असलेला व्हिडिओ हा देखील नेदरलॅंडमधील शाळेचा नाही. तो लंडनच्या सेंट जॉन शाळेचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : नेदरलँडमधील शाळांमध्ये भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग अनिवार्य करण्यात आले आहेत का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
