अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तेथील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव (impeachment) मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाला. त्यामुळे ट्रम्प यांचे पद धोक्यात आले आहे. असे असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल ट्रम्प यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या एका ट्विटचा फोटो पोस्टमध्ये दिलेला आहे. यामध्ये मोदी लिहितात की, “आपल्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही जे पाहिजे होतं ते मिळवलं. आपल्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मंजुर झाला. या यशासाठी मी आपले अभिनंदन करतो. डोनाल्ड ट्रम्प मला तुमचा अभिमान वाटतो. (मराठी भाषांतर)

हे ट्विट शेयर करून एका युजरने लिहिले की, म्हणुन थोडा तरी शिकलेला प्रधानमंत्री असावा यार ! लाज आणतात.

मूळ पोस्ट येथे पाहू शकता - फेसबुक

फेसबुकवर अनेक युजर्सने या ट्विटचा फोटो शेयर करून मोदींना महाभियोगाचा अर्थ कळत नसल्याची टिप्पणी केली. एकाने लिहिले की, लाज घालवणार ह्यो प्रधानमंत्री. तिकडे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यास हाउस ऑफ रिप्रेझेंटिव्हने परवानगी दिली आणि इकडं आपल्या प्रधानमंत्र्याला हे काहीतरी भारी असते असे वाटून त्यांनी केलं डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभिनंदनाच ट्विट. लोकांनी टिंगल टवाळी केल्यानंतर केलं ट्विट डिलीट. यासाठी माणूस शिकलेला असावा लागतो..!

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

नरेंद्र मोदी यांनी खरंच ट्रम्पच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले का? याचा शोध घेतला. सर्वप्रथम मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटची तपासणी केली. तेव्हा अशा प्रकारचे एकही ट्विट तेथे आढळले नाही. पोस्टमधील ट्विटची तारीख 19 डिसेंबर दिलेली आहे. त्या दिवशी मोदी यांनी ट्रम्प यांच्या बाबतीत एकही ट्विट केल्याचे दिसत नाही.

19 डिसेंबर रोजी पोर्तुगालचे पंतप्रधान अँन्टोनियो कॉस्ता भारत दौऱ्यावर आले होते. मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यानचे पाच ट्विट केले होते.

पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी कॉस्ता यांच्यासोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी वरील ट्विटमधील मजकूर पोर्तुगीज भाषेतून ट्विट केला.

तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी कोस्ता यांच्या उपस्थितीत गांधी-150 उत्सवसोहळ्याची दुसरी बैठक पार पडल्याची माहिती दिली.

चौथ्या आणि पाचव्या ट्विटमध्ये याच कार्यक्रमातील फोटो शेयर करण्यात आले आहेत.

म्हणजे 19 डिसेंबर रोजी ट्रम्प यांना महाभियोगाच्या शुभेच्छा दिल्याचे ट्विट मोदींच्या अकाउंटवर नाही.

मग त्यांनी हे ट्विट डिलीट केले का?

सदरील ट्विटचे निरीक्षण केल्यावर त्यात अनेक विसंगती दिसून येतात. त्यावरून या ट्विटची सत्यता शंकास्पद वाटते. त्याचे कारण-

1. ट्विटची वेळ लिहिण्याची पद्धत चुकली आहे. ट्विटवर नेहमी वेळेसमोर AM किंवा PM असे दर्शविले जाते. पोस्टमधील ट्विटमध्ये केवळ 7:31 असे दिले आहे. AM/PM काहीच नाही.

2. ट्विटची तारीख लिहिण्याची पद्धत चुकली. ट्विटची तारीख नेहमी महिना-तारीख-वर्ष अशा पद्धतीने दिली जाते. तसेच वर्ष पूर्ण आकड्यात (2019) दिले जाते. पोस्टमधील ट्विटमध्ये चुकीचा शॉर्टफॉर्म (19 Dec 19) वापरलेला आहे.

3. ट्विटची तारीख आणि ट्विट कोणत्या साधनावरून केले (Web App/iPhone) यामध्ये एक बिंदू (डॉट) असतो. पोस्टमधील ट्विटमध्ये तो नाही.

4. Wonderful achievement of impeached असे चुकीचे लिहिलेले आहे. ते Wonderful achievement of impeachment असे हवे. खरंच हे ट्विट केले असे मानले तर त्यात किमान इंग्रजी भाषेची एवढी मोठी चूक होण्याची शक्यता तशी फारच कमी.

याचा अर्थ की, हे अभिनंदानाचे ट्विट फोटोशॉप करून तयार करण्यात आले आहे. डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट असा चुकीचा असू शकत नाही.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, मोदींनी ट्रम्प यांना महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या नाहीत. खोडसाळपणे फोटोशॉप केलेले खोटे ट्विट तयार करून तसा दावा केला जात आहे. वाचकांनी त्यावर विश्वास ठेवून नये. आपल्याकडेदेखील असे शंकास्पद फोटो, व्हिडियो किंवा मेसेजेस असतील ते आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा. फॅक्ट क्रेसेंडोकडून त्याची सत्य पडताळणी करण्यात येईल.

Avatar

Title:डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False