रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

Mixture/अर्धसत्य आंतरराष्ट्रीय | International

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेआधी उडपी श्रीकृष्ठ मठ आणि तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडियो बरेच गाजले होते. तसेच इस्रोच्या कोणत्याही मोहिमेआधी विधिवत पूजा करण्यावर नेहमीच टीका होते. याला उत्तर म्हणून सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील नासामध्ये मोहिमेआधी चर्चच्या फादरकडून विधी केले जात असल्याचे फोटो शेयर होत आहेत. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या जागी आहे, असल्याचे याद्वारे सांगण्यात येत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

चर्चमधील पाद्री स्पेस मिशनमधील रॉकेटची पूजा करताना आणि अंतराळवीरांना आशीर्वाद देतानाचे काही फोटो शेयर करण्यात आले आहेत. सोबत लिहिले की, इस्रोच्या सिवन यांनी पूजा केलेले फोटो टाकून त्यावर विज्ञानाचा मुलामा चढवून, विज्ञानाच्या आड लपून टीका करणारे, नासा आणि इसरोची तुलना करून विज्ञानाची शेखी मिरवणारे…कुठे आहेत? नासावाले मोहिमेच्या आधी आणि एखादे शास्त्र वापरण्या अगोदर काय काय करतात ते पण पहा जरा. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या जागी आहे, ते तुम्ही सिवनला पण शिकवू नका आणि नासाला पण शिकवू नका आपल्यापेक्षा जास्त जाणतात ते विज्ञान.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोंची एक-एक करून पडताळणी करूया. प्रत्येक फोटोची सत्य माहिती घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले.

फोटो क्र. 1

मूळ फोटो येथे पाहा – रेडिटअर्काइव्हयुरोमेडन प्रेसअर्काइव्ह

हा फोटो रशियातील आहे. तो नासा किंवा अमेरिकेतील नाही. यामध्ये स्पेस मिशनमधील रॉकेट नाहीए. हा फोटो आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा आहे. टोपोल-एम नावाच्या या अणू-क्षेपमास्त्राची पूजा करताना रशियन ऑर्थोडॉक्स प्रीस्ट दिसत आहेत.

फोटो क्र. 2

मूळ फोटो येथे पाहा – अलामीअर्काइव्ह

हा फोटोसुद्धा अमेरिकेतील नाही. कझाकस्तान येथून 12 सप्टेंबर 2017 रोजी नासा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक्सपेडिशन 53 मिशनअंतर्गत या अंतराळवीरांनी रशियाच्या सोयूझ यानातून उड्डाण केले होते. तत्पूर्वी, कॉस्मोनॉट हॉटेलमध्ये रशियन ऑर्थोडॉक्स प्रीस्टने अंतराळवीरांना आशीर्वाद दिला होता.

फोटो क्र. 3

मूळ फोटो येथे पाहा – अलामीअर्काइव्हविकमीडिया

हा फोटोदेखील नासा किंवा अमेरिकेचा नाही. कझाकस्तानमधील कॉस्मोड्रोम लाँच पॅड येथे 27 मे 2013 रोजी सोयूझ रॉकेटची रशियन ऑर्थोडॉक्स प्रीस्ट यांनी पूजा केली होती. हा फोटो तेव्हा घेण्यात आला होता.

फोटो क्र. 4

मूळ फोटो येथे पाहा – अलामीअर्काइव्ह

या फोटोमध्ये अमेरिकन अंतराळवीर जॅक फिशरला पारंपरिक रीतिरिवाजानुसार रशियन ऑर्थोडॉक्स प्रीस्टतर्फे आशीर्वाद देण्यात आले. कझाकिस्तानातील अवकाश केंद्रातील 20 एप्रिल 2017 रोजी हा फोटो काढण्यात आला होता. म्हणजे हा विधी नासाने नाही तर रशियाच्या स्पेस एजन्सीतर्फे करण्यात आला होता.

फोटो क्र. 5

मूळ फोटो येथे पाहा – व्हॉल्गोडॉन्स्क डायोसिज । अर्काइव्ह

रशियन हवाई दल दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2015 रोजी तेथील वॉल्गोडॉन्स्क डायोसिजचे बिशप क्षेपणास्त्र आणि फायटर विमानांची पूजा करताना दिसत आहेत. हा फोटो नासा किंवा अमेरिकेचा नाही.

या फोटोवरून त्याकाळी वाददेखील झाला होता. सीरियामध्ये हल्ला करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची पूजा करतानाचा हा फोटो असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, वॉल्गोडॉन्स्क डायोसिजनने स्पष्टीकरण दिले होते की, सीरियावर हल्ला करण्याआधी काही महिन्यांपूर्वी हा फोटो काढण्यात आला होता.

यावरून हे सिद्ध होते की, पोस्टमधील सगळे फोटो रशियासंबंधी आहेत. त्यांच्या नासा किंवा अमेरिकेशी थेट संबंध नाही. 

विशेष म्हणजे याच वर्षी रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चने निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या क्षेपणास्त्रांची पूजा न करण्यावर बंदी घालण्याचा विचार करीत आहे.

मूळ बातमी येथे वाचा – मॉस्को टाईम्सअर्काइव्ह

निष्कर्ष

पोस्टमधील फोटो रशियाचे आहेत. अमेरिका किंवा नासातील स्पेस मिशनदरम्यान ते काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अवकाशयानांची पूजा करतानाचे हे फोटो नासाचे असल्याचा दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture