सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

युद्धामध्ये लहान मुलांचे बालपण होरपळून निघते. याची प्रचिती देणारे एक छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रक्त आणि धुळीने माखलेला एक चिमुरडा रडत असल्याचे या फोटोमध्ये दिसते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव युद्धाचे विदारक सत्य सांगतात. या फोटोसह दावा केला जात आहे की, सीरियातील या तीन वर्षीय मुलाचा बॉम्ब हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने डॉक्टरला म्हटले की, भगवान से तुम सबकी शिकायत करूंगा (मी देवाकडे तुमच्या सगळ्यांची तक्रार करणार). 

युद्धबळी ठरलेल्या या मुलाचे मन हेलावून टाकणारे हे शेवटचे शब्द लोकांना खूप भावले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पत्रिका वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण पोस्टमध्ये शेयर करण्यात आले आहे. भगवान से तुम सबकी शिकायत करूंगा अशा मथळ्याखाली बातमीत म्हटले की, “ सीरियातील युद्धात बॉम्ब हल्ल्यामध्ये हा तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत असताना तो म्हणाला की, मी देवाकडे तुमच्या सगळ्यांची तक्रार करणार आहे. मी देवाला सगळं खरं खरं सांगणार.” अंतर्गत रक्तस्राव झाल्याने थोड्याच वेळात या मुलाने शेवटचा श्वास घेतला. रिचर्ड एडमंडसन यांनी अपरूटेड पॅलेस्टेनियन्स ब्लॉगवर ही माहिती देण्यात आल्याचे बातमीत म्हटले आहे.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोचे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी गुगलवर रिव्हर्स इमेज आणि विविध कीवर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून रिचर्ड एडमंडसन यांनी अपरूटेड पॅलेस्टेनियन्स ब्लॉगवर असा काही लेख लिहिल्याचे आढळले नाही. परंतु, इतर अनेक ब्लॉगपोस्ट् आणि वेबसाईटवर हा फोटो वापरून अगदी 2013 पासून वरीलप्रमाणेच दावा केल्याच समोर आले. 

हा फोटो एवढा प्रसिद्ध आहे की, त्यावरून प्रेरित होऊन त्याच नावाने एक गाणे आणि चित्रपटसुद्धा बनला आहे. तसेच निकोलस फौरिकिस यांनी याच नावाच्या पुस्तकामध्ये या फोटोबद्दल हाच दावा केला आहे. मराठीमध्ये बोभाटा नावाच्या वेबसाईटवरसुद्धा असा लेख आहे.

वर्ल्ड ऑब्जर्व्हर ऑनलाईन नावाच्या वेबसाईटवर 29 डिसेंबर 2013 रोजीच्या लेखामध्ये म्हटले की, हा फोटो सीरियातील असून, या मुलाने I’m gonna tell God everything म्हटले होते. परंतु, याची पुष्टी करणे अशक्य आहे.

मूळ लेख येथे वाचा – वर्ल्ड ऑब्जर्व्हर ऑनलाईनअर्काइव्ह

अधिक सर्च केल्यावर लक्षात येते की, या मुलाने मी देवाकडे तुमची तक्रार करेल असे म्हटले होते याचा कोणताही पुरावा इंटरनेटवर उपलब्ध नाही.

मग हो फोटो कोणी काढला याचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, AFP वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार अ‍ॅरिस मेसिनिस यांनी 24 ऑगस्ट 2012 रोजी हा फोटो काढला होतो. फोटोच्या कॅप्शननुसार, सीरियातील अल्लेप्पो शहराच्या उत्तर भागात त्यादिवशी बशर अल-असाद यांच्या फौजेने जोरदार हवाई हल्ला केला होता. यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना अ‍ॅरिस यांनी हा फोटो काढला होता. 

मूळ फोटो येथे पाहा – AFPअर्काइव्ह

न्यूयॉर्क टाईम्स आणि टाईम मॅगझीनच्या बातमीत याच मुलाचे फोटो वापरण्यात आले होते. परंतु, तेथे हा मुलगा केवळ जखमी झाल्याचे म्हटले आहे. त्याचा मृत्य झाला किंवा त्याने देवाल सगळं सांगेन असे काही म्हटल्याचे उल्लेख नाही. मग या फोटोंची खरी कहाणी काय?

फॅक्ट क्रेसेंडोने मूळ छायाचित्रकार अ‍ॅरिस मेसिनिस यांच्याशी संपर्क केला. त्यांनी फोटोसोबत केला जाणारा दावा चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. हा मुलगा जिवंत असून, त्याने देवाला सगळं सांगेल असे म्हटलेच नव्हते. मेसिनिस यांनी पुढे सांगितले की, या मुलाचा जरी सुदैवाने मृत्यू झालेला नसला, तरी या युद्धात इतर हजारो निष्पाप मुलांचा बळी गेलेला आहे. 

अ‍ॅरिस मेसिनिस सध्या AFP वृत्तसंस्थेकरिता ग्रीसमधील अथेन्स शहरात चीफ फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ग्रीसमधील बेटांवर येणाऱ्या स्थलांतरितांच्या आगमनाच्या फोटोंसाठी त्यांना 2016 साली फ्रान्सचा प्रेस फोटोग्राफीचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता. अनेक युद्धग्रस्त भागात त्यांनी काम केले आहे. 2012 मध्ये अलेप्पो शहरात हल्ला झाला त्यावेळी त्यांनी या मुलाचे विविध फोटो काढले होते. गेटी इमेजस वेबसाईटवर ते उपलब्ध आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता. फोटो पाहण्यासाठी उजव्या बाजूस क्लिक करा.

Embed from Getty Images

निष्कर्ष

सीरियामध्ये हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलाने मृत्यूपूर्वी “देवाकडे तुमची तक्रार करणार” किंवा “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. हा फोटो काढणाऱ्या मूळ छायाचित्रकाराने हा दावा खोटा असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.

सूचना: युद्धाची क्रूरता जगासमोर मांडणारा हा फोटो आहे. युद्धामुळे कित्येक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला. या फोटोतून सीरियातील मुलांची गंभीर परिस्थिती समोर येते. व्हायरल असलेला दावा जरी खरा नसला तरी, फोटोतील भीषणता शंभर टक्के खरी आहे. फॅक्ट क्रेसेंडोचे हेच मत आहे.

Avatar

Title:सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False