FACT CHECK: लंडनमध्ये सगळ्या बसेसवर ‘WELCOME MODI JI’ असे लिहिलेले आहे का?

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून लवकरच शपथ घेणार असून, भाजप समर्थकांमध्ये आनंदाची लहर आहे. केवळ भारतातच नाही तर विदेशातही मोदींचा विजयोत्सव साजरा केला जात असल्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहेत. अशाच एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, लंडनमध्ये सगळ्या सिटी बसेसवर ‘Welcome Modi Ji’ असे लिहिलेले आहे. पुरावा म्हणून सोबत एका दोन मजली निळ्या बसचा फोटो दिला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या पार्श्वभूमीवर पसरविले जाणाऱ्या फोटोंची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

‘WELCOME MODI JI’ असे लिहिलेल्या एका बसचा फोटो शेयर करून लिहिले की, लंडनध्ये सगळ्या बसेसवर वेल्कम मोदीजी असे लिहिलेले आहे. भारतासाठी ही गौरवास्पद गोष्ट आहे.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अनेक ट्विटर यूजर्सने तो शेयर केल्याचे आढळले. विश्वेश्वर भट नामक युजरने 18 एप्रिल 2018 रोजी केलेल्या ट्विटमध्ये या बसचे वेगवेगळ्या अँगलचे फोटो आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता. बसवर मोदींचा फोटो असून सोबत लिहिले की- We Remember India’s Contribution in WW1 & WW2 (पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारताने दिलेल्या योगदान आम्ही जाणतो).

ट्विटमध्ये म्हटले की, इंग्लंड भेटीनिमित्त येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्वागतसंदेश असणारी लंडन सिटी टूर बस शहरभर फिरत आहे. हा धागा पकडून शोध घेतला असता एबीपी न्यूजची 17 एप्रिल 2018 रोजीची एक बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, मोदी सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर असून ते स्वीडनहून लंडनला जाणार आहेत तेथे त्यांच्या स्वागतासाठी टूर बसेसवर WELCOME MODI JI असे लिहिलेले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील या बसचा फोटो शेयर केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – एबीपीअर्काइव्ह

याचाच अर्थ की, ही बस लंडनमधील प्रसिद्ध लाल रंगाची सिटी बस नसून, पर्यटकांना लंडनदर्शन घडवणारी टूर बस आहे. मग त्यापद्धतीने शोधल्यावर गोल्डन टूर्स कंपनीचे नाव समोर आले. या खासगी कंपनीद्वारे लंडनमध्ये टूर बसेस चालविण्यात येतात. त्यांच्यावेबसाईटवर व्हायरल होत असलेल्या निळ्या बसशी साम्य असणाऱ्या बसेसचे फोटो आहेत. कंपनीद्वारे बसेसवर जाहिरातदेखील केली जाते. मोदींच्या लंडन दौऱ्यादरम्यान एका आठवड्यासाठी त्यांच्या स्वागताची जाहिरात करण्यात आली असावी.

ट्विटमधील बसवर 125 क्रमांक आहे. कंपनीचे नाव आणि बस क्रमांक मिळाल्यामुळे सदरील बस शोधणे शक्य झाले. मोदींची जाहिरात असेलेली बस आणि जाहिरात नसलेली बस यांची तुलना खाली केली आहे.

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला 2018 मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त लंडनमध्ये रिमेम्बरिंग इंडियन सोल्जर्स या प्रकल्पाअंतर्गत भारतीय सैनिकांच्या पहिल्या महायुद्धातील योगदानाची माहिती लोकांना व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. यामध्ये ‘इन्स्पायरिंग माईंड’ ही बस एप्रिल ते जुलै 2018 दरम्यान सुरू करण्यात आली होती. या टूर बसमध्ये ऑडियो-व्हिज्युअलच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी पहिल्या महायुद्धात केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. गोल्डन टूर्स कंपनीने या प्रकल्पासाठी ही बस उपलब्ध करून दिली होती.

याविषयी अधिक येथे वाचा – इंडिया 1914

मोदींच्या स्वागतासाठी टूर बसेसवर संदेश लिहिण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी 2015 साली मोदी जेव्हा प्रथमच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा तेथील भारतीयांनी मिळून यूके वेल्कम्स मोदीअंतर्गत एका महिन्यासाठी मोदी एक्सप्रेस बस सुरू केली होती. निळ्या रंगाच्या या बसवर UK WELCOMES MODI असे लिहिलेले होते.

निष्कर्ष

WELCOME MODI JI असे लिहिलेल्या बसचा फोटो 2018 मधील आहे. ती एक खासगी टूर बस होती. लंडनची सरकारी सिटी बस नव्हती. त्यामुळे लंडनच्या सगळ्या बसेसवर मोदींसाठी संदेश लिहिण्यात आल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: लंडनमध्ये सगळ्या बसेसवर ‘WELCOME MODI JI’ असे लिहिलेले आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False