
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या प्रदर्शनांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद व बळाचा वापर होत आहे. त्यामुळे दोन्हींकडून एकमेकांवर हिंसा करण्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमिवर दावा केला जात आहे की, दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पोलिसांचे कपडे घालून फिरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
काय पोस्टमध्ये?
पोस्टमधील व्हिडियोमध्ये आंदोलनस्थळी एका पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीवर नावाचा बिल्ला (नेम प्लेट) नसल्याचे दिसते. चित्रिकरण करणारा व्यक्ती पोलिसांना बिल्ला का नाही याची विचारणा करतो. त्यावर उत्तर मिळते की, बिल्ला पडला असेल. या पोलिसांचा चेहरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात असलेल्या एका व्यक्तीचा फोटो दोहोंमध्ये साम्य असल्याचे दाखवत पोस्टकर्त्याने लिहिले की, “देशात जातिय दंगली घडल्या नव्हत्या जाणिव पुर्वक घडवल्या गेल्या होत्या. RSS चे खोटे पोलिस पाठऊन देशात हींसा घडवण्याचे काम मोदी सरकार करत आहे.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटोमध्ये उजव्या बाजूने उभे असलेले व्यक्ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. राजस्थानमधील कोटा-बुंदी मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूण आले होते. मग या फोटोमध्ये त्यांच्यासोबत उभा असलेला व्यक्ती कोण आहे याची माहिती काढण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने राजस्थानमधील भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
खाजुवाला (बिकानेर) येथील माजी आमदार डॉ. विश्वनाथ मेघवाल यांनी या फोटोत बिर्ला यांच्या सोबत भाजप आमदार अशोक डोगरा असल्याची शक्यता वर्तवली.

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
हा धागा पकडून मग अशोक डोगरा यांचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, राजस्थानमधील बुंदी मतदारसंघाचे डोगरा आमदार आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर बिर्ला यांच्यासोबतचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. दिल्ली पोलिस अधिकारी, संघाच्या गणवेशातील व्यक्ती आणि आमदार अशोक डोगरा यांची तुलना करून पाहुया.

मग हे पोलिस अधिकारी कोण आहेत?
फॅक्ट क्रेसेंडोच्या हिंदी टीमने केलेल्या पडताळणीत या पोलिस अधिकाऱ्याचे नाव विनोद नारंग असल्याचे समोर आले. दिल्ली येथील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्याचे ते प्रमुख आहेत. फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, वर्दीतील फोटो त्यांचाच असून, दुसरा संघाच्या गणवेशातील फोटो त्यांचा नाही.
“माझा आरएसएसशी काहीही संबंध नाही. सीएएविरोधात आंदोलन सुरू असताना मी माझी ड्युटी करीत होतो. माझ्या फोटोचा दुसऱ्या व्यक्तीच्या फोटोशी चुकीचा संबंध जोडण्यात येत आहे”, असे ते म्हणाले. त्यांनी आम्हाला त्यांचा एक फोटोदेखील पाठवला.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, नावाचा बिल्ला नसलेला दिल्ली पोलिस अधिकारी आणि संघाच्या वेशातील आमदार अशोक डोगरा हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. दोघांच्या फोटोंचा संबंध जोडून चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे.

Title:राजस्थानच्या आमदाराचा फोटो दिल्लीतील खोटा पोलिस म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
