Fact : हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात नव्हे, व्हिडिओ दिल्लीतील

False सामाजिक

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला पुण्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महत्वाच्या शहरांना जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणूनही याच्याकडे पाहिले जाते. दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि यात अनेकांचा बळी जात असतो. त्यामुळे या महामार्गावरील अपघात तसेच नवीन नाहीत. सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत असून तो मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे. समीर साळुंके यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी  

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दाट धुक्यामुळे असा अपघात घडला का हे जाणून घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यावेळी अशी घटना घडल्याचे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाताचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत असल्याने आम्ही तो नीट पाहिला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर म्हणजेच महाराष्ट्रात घडला असतानाही या व्हिडिओत एकही व्यक्ती मराठीत बोलत नसल्याने आम्हाला आश्चर्य वाटले. त्यानंतर आम्ही यातील एक दृश्य घेत ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात इंडिया टूडेच्या संकेतस्थळावरील 8 नोव्हेंबर 2017 रोजीचे वृत्त दिसून आले. या वृत्तात दाट धुक्यामुळे यमुना द्रुतगती महामार्गावर 18 कार एकमेंकावर आदळल्याचे म्हटले आहे. या वृत्तासोबत या अपघाताचा व्हिडिओ देखील देण्यात आला आहे.

screenshot-www.indiatoday.in-2019.12.30-10_12_12.png

इंडिया टूडेच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

हाच व्हिडिओ युटूयूबवरही अनेक ठिकाणी यमुना द्रुतगती महामार्गावरील अपघाताचा व्हिडिओ म्हणून 8 नोव्हेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आपण खाली पाहू शकता. 

Archive 

हवामानशास्त्र विभागाच्या महामार्गावरील हवामानाची स्थिती दर्शविणाऱ्या संकेतस्थळावरही आम्हाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दाट धुक्याची स्थिती दर्शविणारी कोणतीही माहिती दिसून आली नाही. 

निष्कर्ष

यमुना द्रुतगती महामार्गावर 8 नोव्हेंबर 2017 रोजी घडलेल्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे. सध्या तो यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दाट धुक्यामुळे झालेल्या अपघाताचा म्हणून पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात नव्हे, व्हिडिओ दिल्लीतील

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False