नरेंद्र मोदींनी भाषणात हिटलरचे Hate Me, but Don’t Hate Germany वाक्य उचलले का? पाहा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली येथे भाषणात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधकांना उद्देशून म्हटले की, हवे तर माझे पुतळे जाळा; परंतु बस किंवा इतर सार्वजनिक संपत्तीला हानी पोहचवू नका. काही इंग्लिश मीडियावेबसाईट्सने मोदींच्या या भाषणाची बातमी देताना Hate Me, But Don’t Hate India असे शीर्षक दिले. यावरून अनेक युजर्सने या वाक्याचा हिटलरच्या एका भाषणाशी संबंध जोडला. त्यासाठी हिटलरच्य भाषणाची एक क्लिप शेयर करण्यात आली ज्यामध्ये हिटलर Hate Me, But Don’t Hate Germany असे म्हणत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मग मोदींनी खरंच हिटलरच्या भाषणातून हे वाक्य उचलले का? याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

नरेंद्र मोदी आणि हिटलरच्या भाषणाची क्लिप पोस्टमध्ये शेयर करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या क्लिममध्ये मोदी म्हणतात की, “…तो आप मोदी को गाली दो भाई, मोदी को नफरत करो. मोदी का जितना विरोध करना है जरूर करो. आपको मोदी से नफरत है, गुस्सा जितना निकालना है निकालो. अरे मोदी का पुतला लगा कर के आते-जाते जितने जुते मारने है मारो. मोदी का पुतला जलाना है जलाओ. लेकिन देश की संपति मत जलाओ. गरीब का ऑटोरिक्षा मत जलाओ, गरीब की झोपडी मत जलाओ.”

दुसऱ्या क्लिपमध्ये हिटलरचे जर्मन भाषेतील भाषण आहे. त्यात दिलेल्या इंग्रजी सबटायटलनुसार तो म्हणतो की, I know who is hating me. Hate me it is your wish, but don’t hate Germany. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

दिल्ली येथील रामलीला मैदानावर नरेंद्र मोदी यांनी 22 डिसेंबर रविवारी भाषण केले होते. यामध्ये त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याचे (CAA) समर्थन करताना त्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. ‘हवे तर माझे पुतळे जाळा; परंतु सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका. तुम्ही माझा तिरस्कार करत असाल तर माझ्यावर तुमचा राग काढा, माझ्या पुतळ्याला जोड्याने मारा. परंतु, गरीबांचे नुकसान करू नका’, असे ते म्हणाले होते. यामध्ये कुठेही “माझा तिरस्कार करा; परंतु देशाचा तिरस्कार करून नका” (मुझसे नफरत करो, मगर देश से नफरत मत करो) असे शब्दशः म्हटले नाही. 

संपूर्ण भाषण आपण येथे पाहू शकता. इंडिया टुडेसह इतर वेबसाईट्सने भाषणाची बातमी देताना Hate Me, But Don’t Hate India असा मथळा दिला. 

मग हिटलर असे म्हणाला होता का?

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये उजव्या बाजूला वर British Pathe या व्हिडियो कंपनीचा लोगो आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर ब्रिटिश पाथेने हिटलरच्या मूळ भाषणाचा सुमारे दोन मिनिटांचा व्हिडियो युट्यूबवर अपलोड केल्याचे आढळले. तो तुम्ही खाली पाहू शकता. या व्हिडियोच्या पहिल्या 23 सेकंदामधून सदरील व्हायरल क्लिप एडिट केलेली आहे.  मूळ व्हिडियो जर्मन भाषेतून आहे.

शीर्षकानुसार, हा व्हिडियो 1936 सालच्या हिवाळ्यातील नाझींच्या रॅलीमध्ये भाषण करतानाचा आहे. ब्रिटिश पाथेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, हा व्हिडियो नेमका कुठला व कोणत्या तारखेचा आहे याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु, व्हिडियोच्या सुरुवातीला Winterhilfswerk 1936-37 असे लिहिलेले एक बॅनर दिसते.

Winterhilfswerk या जर्मन शब्दाचे इंग्रजी भाषांतर – Winter Relief (Organization) असे होते. याविषयी माहिती घेतली असता कळाले की, अ‍ॅडॉल्फ हिटलरने हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत गरीब जनतेला अन्न, गरम कपडे, कोळसा व अन्य अत्यावश्यक गोष्टींची मदत पुरवण्यासाठी Winterhilfswerk उपक्रमाची 1933 मध्ये सुरुवात केली होती. या अंतर्गत जनतेला दानधर्म करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात येत असे. दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा उपक्रम राबविला जायचा.

हा धागा पकडून जेव्हा Winterhilfswerk 1936-37 विषयी शोध घेतला तेव्हा न्यूयॉर्क टाईम्सने 1936 साली दिलेली एक बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, हिटलरने 6 ऑक्टोबर 1936 रोजी बर्लिन येथे चौथ्या Winter Relief (Winterhilfswerk) उपक्रमाचे उद्घाटन केले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्याने जर्मनीला बलशाली राष्ट्र बनविण्याचा मानस व्यक्त केला होता. 

मूळ बातमी येथे वाचा – न्यूयॉर्क टाईम्स

ब्रिटिश पाथेकडे जो सुमारे दोन मिनिटांचा व्हिडियो आहे, तोच व्हिडियो इंटरनेट अर्काइव्ह वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याच्या शीर्षाकानुसार तो व्हिडियो 1396 मधील Winter Relief उपक्रमाच्या उद्घाटनाचा आहे. 

या भाषणात हिटलर नेमके काय बोलतो हे कळण्यासाठी त्या भाषणाची मूळ जर्मन भाषेतील प्रत मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने शोध घेतला असता नाझी पार्टीच्या अधिकृत प्रकाशन संस्थेने 1933 ते 1936 दरम्यान हिटलरने Winter Relief उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणांचा संग्रह प्रसिद्ध केल्याचे आढळले. यामध्ये पान क्रमांक 19 वर हिटलरने 1936 साली केलेले मूळ जर्मन भाषण दिलेले आहे. 

मूळ भाषण येथे वाचा – Speeches at Winter Relief Organization (1933-1936)

व्हायरल क्लिपमध्ये हिटलर नेमके काय बोलतो हे जर्मन ट्रान्सलेटरच्या मदतीने फॅक्ट क्रेसेंडोने शोधून काढले. जसे की आपल्याला माहित आहे की, व्हायरल क्लिप ब्रिटिश पाथेच्या व्हिडियोच्या पहिल्या 23 सेकंदातून घेतलेली आहे. या 23 सेकंदात तो म्हणतो की-

मूळ जर्मन भाषण: Es ist wirklich etwas Wunderbares, die Volksgemeinschaft so aufzufassen, nicht in einer Vereinsrede von einem Volk von Brüdern zu sprechen, sondern hineinzugehen in das Volk, alle feine Vorurteile allmählich zu überwinden und dann zu helfen und immer wieder zu helfen.”

इंग्रजी भाषांतर: It’s really a wonderful thing to understand the national community in this way, not to speak of a people of brothers in an club speech, but to go into the people, to gradually overcome all fine prejudices and then to help them again and again.

या भाषणात हिटरलने जर्मनीच्या पुनर्निर्माणाची आवश्यकता आणि त्यासाठी जर्मन लोकांना कसा पुढाकार घ्यावा लागेल याविषयी विचार मांडलेले आहेत. रशियामध्ये विकासाचे केवळ स्वप्न दाखवले; परंतु, जर्मनीने ते सत्यात उतरून दाखविले. जर्मन नागरिक म्हणून प्रत्येकाने भेदाभेद दूर सारून एकदिलाने सगळ्यांची मदत करण्याचे त्याने आवाहन केले होते.

यावरून स्पष्ट होते की, हिटलरने सदरील क्लिपमध्ये Hate Me, But Don’t Hate Germany असे म्हटलेले नाही. विशेष म्हणजे या संपूर्ण भाषणात हिटलर अशा आशयाचे काहीच बोलला नव्हता. फॅक्ट क्रेसेंडोने या वाक्याचे इंग्रजी भाषांतर (Hasse mich, aber hasse Deutschland nicht) करून शोध घेतला असता हिटलरने असे म्हटल्याचे आढळले नाही.

मूळ फोटो येथे पाहा – Getty ImagesAlamy

इतर फॅक्ट-चेकर कुठे चुकले?

रविवारी मोदींच्या भाषणानंतर लगेच हिटलरचा हा व्हिडियो व्हायरल होऊ लागला. त्यामुळे अनेक फॅक्ट चेकिंग वेबसाईट्सने याची तथ्य पडताळणी केली. परंतु, या क्लिपमध्ये हिटलरने Hate Me, Don’t Germany असे म्हटलेच नाही हे सिद्ध करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. फॅक्ट-चेकर्सनी क्रिटिकल पास्ट आणि इंटरनेट अर्काइव्ह वेबसाईटवर विश्वास ठेवून हिटलरच्या भाषणाचा हा व्हिडियो 5 ऑक्टोबर 1937 रोजीचा असल्याचे गृहीत धरले. खरं तर तो व्हिडियो एका वर्षाआधीचा (1936) आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोला 5 ऑक्टोबर 1937 रोजीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे तिकिट आढळले. यावर स्पष्ट 1937/38 असे लिहिले आहे. जसे की आपण व्हिडियोमध्ये पाहिले की, तेथे बॅनरवर 1936/37 लिहिलेले आहे. त्याच बॅनरचा गेटी इमेजेस वेबसाईटवर फोटो आढळला. गेटीच्या नोंदीनुसार, हा फोटो 6 ऑक्टोबर 1936 रोजी काढण्यात आला होता. यावरून स्पष्ट होते की, व्हिडियो 1936 सालातील आहे. तो 1937 मधील नाही.

मूळ तिकिट येथे पाहा – USM Books

मूळ फोटो येथे पाहा – Getty Images

तसेच फॅक्ट-चेकर्सनी व्हायरल क्लिपमध्ये हिटलर नेमके (Word to Word) काय म्हणाला हे दिलेले नाही. अनेकांनी हिटलर लोकांमध्ये जाऊन मदत करा असे म्हणत असल्याचे सांगितले; परंतु, ही क्लिप वाक्याच्या मधूनच सुरू होत असल्यामुळे त्याचा पूर्ण अर्थ खात्रीने सांगता येत नव्हता. त्यामुळे अनेकांनी 1937 च्या इंग्रजी भाषांतराच्या सहाय्याने व्हिडियोचे फॅक्ट-चेक केले. मात्र, पूर्णपणे समजण्यासाठी मूळ जर्मन भाषण आवश्यक होते.

निष्कर्ष

व्हायरल होत असलेली क्लिप हिटलरच्या 1936 साली दिलेल्या भाषणाची आहे. यामध्ये तो Hate me but don’t hate Germany असे म्हणत नाही. विशेष म्हणजे या भाषणात तो कुठे असे म्हणाला नव्हता. या क्लिपमध्ये तो नागरिकांना समाजात जाऊन एकमेकांची मदत करण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे मोदींनी हिटलरच्या भाषणातील वाक्य वापरलेले नाही. मूळात मोदींसुद्धा Hate Me, But Don’t Hate India असे शब्दशः म्हटलेले नाही. मीडिया वेबसाईट्सने तसे हेडिंग दिले होते.

Avatar

Title:नरेंद्र मोदींनी भाषणात हिटलरचे Hate Me, but Don’t Hate Germany वाक्य उचलले का? पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False