एका वृद्धाला जमावा द्वारे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुंबईच्या भिंडी बाजारमध्ये पिडित वृद्धाने ‘भारत माता की जय’ नारा दिल्याने मुस्लीम जमावाने त्यांना मारहाण केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना जातीयवादाशी संबंध नाही.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुंबई येथील भिंडी बाजारची घटना. या देशात 'भारत माता की जय' म्हणणाऱ्यांची अशी अवस्था होते. हा इस्लामिक देश नाही. भारतातील एका वृद्ध व्यक्तीची ही अवस्था आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळले की, भाजप नेते मजिंदर सिंग सिरसा यांनी 19 ऑक्टोबर 2019 रोजी हा व्हिडिओ फेसबुक अकाउंटवर शेअर केलेला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “राजस्थानमधील भिलवाडा येथील आझाद चौक मार्केटमध्ये एका वृद्धावर अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.”

https://fb.watch/o1XeOll-Gw/

हा धागा पकडून आधिक सर्च केल्यावर कळाले की, ही घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे आझादपूर चौकात घडली होती.

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने भिलवाडा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दिनेश कुमार यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, “ही घटना 15 ऑक्टोबर 2019 रोजी भिलवाडा येथील आझाद चौकात घडली होती. या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव होतचंद सिंधी होते. त्यांचा मुलगा सोनू जेठानी यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. प्रकरणी पोलिसांनी हेमू सिंधी, इलू सिंधी, भगवान सिंधी उर्फ मनोज, मंजूर शेख, आसिफ शेख, शेयब शेख, पोला शेख आदींना अटक केली होती.

पोलिसांनी माहिती दिली की, होतचंद यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. घटनास्थळी ते इतर फेरीवाल्यांना शिवीगाळ व त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळत होते. या फेरीवाल्यांशी त्यांचा जुना वाद होता. 15 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता होतचंद यांनी फेरीवाल्यांशी वाद घातला. यातूनच पाच-सहा फेरीवाल्यांनी त्यांना मारहाण केली होती. सध्या होतचंद हयात नाहीत.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मुंबईमधील नसून राजस्थानचा आहे. ही घटना 2019 मधील आहे. हा वाद वैयक्तिक असून ‘भारत माता की जय’ नारा दिल्याने वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली नव्हती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भारत माता की जय म्हटल्याने वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False