जातीवादावर चित्रपट न काढण्याचा शिवसेनेने इशारा दिला आहे का? जाणून घ्या खरं काय आहे

False राजकीय | Political

आयुषमान खुराणा प्रमुख भूमिकेत असेलल्या ‘आर्टिकल 15’ या सिनेमाच्या ट्रेलरची सध्या खूप चर्चा आहे. जातीवादावर प्रखरपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संवेदनशील विषय हाताळत असल्यामुळे चित्रपटाविषयी काही वादग्रस्त पोस्टदेखील केल्या जात आहेत. शिवसेनेने या चित्रपटाला विरोध दर्शवित जातीवाद हा विषय घेऊन चित्रपट न काढण्याचा इशारा दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

पोस्टमध्ये दोन स्क्रीनशॉट दिले आहेत. एकामध्ये लिहिलेले आहे की, ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात ब्राह्मणांकडून दलितांवर कसे अत्याचार केले जातात हे दाखविल्यामुळे चित्रपटाविरोधात संपूर्ण ब्राह्मण समाज एकवटला आहे. दुसरा स्क्रीनशॉटमध्ये म्हटले की, चित्रपटाच्या कथेत बदल केला नाही तर आग लावण्याचा ब्राह्मण समाजाद्वारे इशारा देण्यात आला आहे. तसेच शिवसेना म्हणाली की, जर चित्रपट चालवायचे असतील तर जातीवादावर चित्रपट काढणे बंद करा.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये आजतक या वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉट दिला आहे. आजतक वाहिनीच्या वेबसाईटवर यासंबंधी कोणतीही बातमी उपलब्ध नाही. त्यामुळे या स्क्रीनशॉटच्या सत्यतेविषयी शंका निर्माण होते. त्यामुळे मग आम्ही मूळ आजतक वाहिनीच्या 21 मे रोजीच्या एका व्हिडियोचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्याची पोस्टमधील स्क्रीनशॉटशी तुलना केली. त्यावरून दोघांतील फरक स्पष्ट दिसून येतो. फेसबुक पोस्टमधील स्क्रीनशॉटमधील मजकुराचा फॉन्ट मूळ फॉन्टपेक्षा एकदम वेगळा आहे. म्हणजेच पोस्टमधील स्क्रीनशॉट हा फोटोशॉप्ड केलेला आहे.

ब्राह्मण समाजाने या चित्रपटाविषयी काही आक्षेप किंवा त्यावरून आंदोलन करण्याची कोणतीही बातमी अद्याप समोर आलेली नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क करून याबाबत विचारणा केली. ही पोस्ट आणि त्यातील माहिती खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘शिवसनेची अधिकृत भूमिका प्रवक्ते मांडत असतात. शिवसेनेच्या नावाखाली पोस्ट शेयर करणारा व्यक्ती शिवसेनेशी संबंधित नाही. शिवसेनेने पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणताही इशारा दिलेला नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

निष्कर्ष

जातीवादावर चित्रपट न काढण्याचा शिवसेनेने इशारा दिलेला नाही. तसा दावा करणाऱ्या पोस्ट असत्य असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पोस्टमधील स्क्रीनशॉट फोटोशॉप्ड केलेले आहेत.

Avatar

Title:जातीवादावर चित्रपट न काढण्याचा शिवसेनेने इशारा दिला आहे का? जाणून घ्या खरं काय आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False