
इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी दारात दीप प्रज्वलन केले, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुनक दारात दिवे ठेवताना दिसतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा?
भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवण्या पूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या दारात दीप प्रज्वलन करताना. गर्व से कहो हम हिंदू है.”
हा व्हिडिओ याच दाव्यासह न्यूज-18 लोकमतनेसुद्धा शेअर केला होता.

मूळ पोस्ट – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम सुनक यांचा हा व्हिडिओ कधीचा आहे याचा शोध घेतला. कीवर्ड सर्चद्वारे सुनक यांच्याच ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ सापडला.
सुनक यांनी 14 नोव्हेंबर 2020 रोजी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता. दिवाळीनिमित्त त्यांनी दारात दिवे लावले होते.
वरील व्हिडिओमध्ये दारावर 11 क्रमांक स्पष्ट दिसतो. डाउनिंग स्ट्रीटवरील 11 क्रमांकाचे घर हे इंग्लंडच्या अर्थमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान आहे. डाउनिंग स्ट्रीटवरील 10 क्रमांकाचे घर हे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे असते.
ऋषी सुनक 2020 साली इंग्लंडचे अर्थमंत्री होते. त्यावर्षी लॉकडाऊनमध्ये दिवाळी साजरा करताना त्यांनी घराबाहेर दिवे ठेवले होते.

मूळ बातमी – गार्डियन
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, घराबाहेर दिवे लावण्याचा सुनक यांचा हा व्हिडिओ 2020 मधील आहे जेव्हा ते इंग्लंडचे अर्थमंत्री होते. त्यामुळे दीप प्रज्वलन करून त्यांनी पंतप्रधान कार्यालयात पहिले पाऊल ठेवले, हा दावा असत्य ठरतो.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:ऋषी सुनक यांनी दीप प्रज्वलन करून पंतप्रधान कार्यालयात प्रवेश केला का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Misleading
