
“अपयश ही यशाची पहिली पायरी असते.”
“’प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.”
यासारखे अनेक प्रेरक विचार आणि वाक्य आपण नेहमीच ऐकतो. इंटरनेटवर तर मोटीव्हेशनल कोट्स, पोस्ट आणि व्हिडियोजची कमी नाही. अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करीत राहावे, एक ना एक दिवस तुम्हाल यश नक्कीच मिळेल, असा धीर देणाऱ्या अनेक गोष्टी सोशली मीडियावर सतत फिरत असतात.
अशीच एक कथा जगप्रसिद्ध फूड चेन केएफसीचे संस्थापक कर्नल हार्लँड सँडर्स यांच्याविषयी सांगितली जाते. खास रे या संकेतस्थळावर दिलेल्या एका लेखानुसार, तब्बल 1009 वेळा ते अयशस्वी ठरले आणि त्यानंतर त्यांना यशाची चव चाखायला मिळाली. या दव्याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

मूळ लेख येथे वाचा – खास रे । अर्काइव्ह
खास रे फेसबुक पेजवरून हा लेख 22 फेब्रुवारी रोजी पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर मराठी आणि व्हायरल इन महाराष्ट्र या फेसबुक पेजवरूनदेखील या लेखाची लिंक पोस्ट करण्यात आली होती. पडताळणी करेपर्यंत हा लेख 1200 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आला होता.
खास रे फेसबुक-अर्काइव्ह । मराठी फेसबुक-अर्काइव्ह । व्हायरल इन महाराष्ट्र फेसबुक- अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
हार्लंड सँडर्स हे केंटकी फ्राइड चिकन (केएफसी) या फास्ट फूड चेनचे संस्थापक आहेत. त्यांच्या योगदानासाठी केंटकी राज्याकडून त्यांना मानद कर्नल पदवी देण्यात आली होती.
संबंधीत लेखात दावा करण्यात आला आहे की, आयुष्यभर विविध ठिकाणी काम करून गरिबीत दिवस काढल्यानंतर कर्नल सँडर्स यांना उतारवयात व्यावसायिक यश लाभले. त्यांनी तयार केलेली चिकन रेसेपी 1009 हॉटेल मालकांनी नाकारली. तरीदेखील त्यांना हार मानली नाही. अखरे 1010 व्या हॉटेल मालकाने त्यांची रेसेपी स्वीकारली आणि केएफसीच्या साम्राज्याला सुरवात झाली.

खास रेच्या लेखात ही माहिती कुठून घेण्यात आली, तिचा स्रोत कोणता याचा काहीच उल्लेख नाही. फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा याबाबत इंटरनेटवर शोध घेतला असता गेल्या अनेक वर्षांपासून ही कथा इंटरनेटवर शेयर केली जात असल्याचे आढळले.
युवरस्टोरी या वेबसाईटवर 25 जुलै 2012 रोजी इंग्रजीतून ही गोष्ट अपलोड करण्यात आली होती. यामध्येदेखील कर्नल सँडर्स यांना 1009 वेळा अपयश आल्याचे लिहिले आहे. परंतु, त्यांनी याला स्पष्टपणे अख्यायिका म्हटले आहे. म्हणजे त्याचा काही ठोस पुरावा नाही.

मूळ आर्टिकल तुम्ही येथे वाचू शकता – युवरस्टोरी । अर्काइव्ह
द न्यूयॉर्कर या प्रतिष्ठित मॅगझीनने 14 फेब्रवारी 1970 रोजी कर्नल सँडर्सची मुलाखत घेऊन त्यांच्या कारकीर्दीविषयी एक दीर्घ लेख छापला होता. त्यामध्ये 1009 वेळा अपयशी होण्याचा उल्लेख नाही. त्यात हे जरूर म्हटले आहे की, सुरवातीच्या काळात मोठ्या हॉटेल मालकांना आकर्षित करणे त्यांना खूप अवघड गेले.

हा मूळ लेख तुम्ही येथे वाचू शकता – द न्यूयॉर्कर । अर्काइव्ह
त्यानंतर मग आम्ही कर्नल सँडर्स यांचे आत्मचरित्र (ऑटोबायोग्राफी) तपासले. त्याचे नाव Harland Sanders: The Autobiography of the Original Celebrity Chef आहे. कर्नल सँडर्स यांनी ते 1966 सालीच लिहिले होते. परंतु, केएफसी कॉर्पोरेशनतर्फे ते 2012 साली प्रकाशित करण्यात आले.

या पुस्तकाच्या पान क्र. 67 वर खुद्ध कर्नल सँडर्स यांनी लिहिले आहे की, सुरवातीला मला फारसे यश मिळाले नाही. अमेरिकेतील कोणत्याही माणसाला माझ्यापेक्षा जास्त वेळा हॉटेलमधून हाकलून लावले नसेल. कारण जेव्हा तुम्ही हॉटेल मालकाला सांगता की, त्याच्या हॉटेलमध्ये मिळणारे चिकन फारसं चांगलं नाही आणि मी त्यापेक्षा जास्त चांगल तयार करून शकतो. तेव्हा कोणत्याही हॉटेल मालकाला अपमान वाटणे स्वाभाविक आहे. पण मी त्याची पर्वा न करता माझ्या पद्धतीवर कायम राहिलो.
संबंधित उताऱ्याचा खाली स्क्रीनशॉट दिला आहे.

कर्नल सँडर्सचे चरित्राबद्दल येथे पाहा – गुडरिड्स । अमेझॉन
यावरून हे दिसून होते की, कर्नल सँडर्स यांनी जेव्हा चिकन रेसेपी हॉटेल मालकांना दाखविली तेव्हा सुरवातीच्या काळात त्यांना फारसे यश मिळाले नाही. अनेक हॉटेल मालकांनी त्यांच्या रेसेपीला नकार दिला. परंतु, 1009 या आकड्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
निष्कर्ष
खास रे च्या लेखातील इतर बाबी जरी पुरेशा सत्य असल्या तरी शीर्षकामध्ये करण्यात आलेला दावा चूक आहे. कर्नल सँडर्स यांना वयाच्या साठीनंतर नेत्रदीपक व्यावसायिक यश मिळाले असले तरी, 1009 वेळा ते अपयशी ठरले असे म्हणण्यास कोणताही आधार नाही. त्यांच्या आत्मचरित्रामध्येदेखील “खूप वेळा नकार मिळाला” असे म्हटले आहे. त्यासाठी कोणताही आकडा दिला नाही. त्यामुळे या लेखाचे शीर्षक चूकीचे आहे.

Title:केएफसीचे संस्थापक खरंच 1009 वेळा अपयशी ठरले होते? जाणून घ्या सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False Headline
