जखमी शीख टेम्पो चालकाचे जुने फोटो दिल्ली दंगलीचे फोटो म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पाठीवर मारहाणीचे वळ उमटलेल्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जातोय की, सीएए विरोधातील आंदोलकाला दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे हे फोटो आहेत. ही पोस्ट आतापर्यंत सुमारे 9 हजार वेळा शेयर करण्यात आली असून, गेल्या 24 तासांत सहा लाखांपेक्षा जास्त युजर्सपर्यंत ती पोहोचली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केल्यावर कळाले की, हे फोटो दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे आहेत.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सदरील फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो 16 जून 2019 रोजी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका टेम्पो चालकाचे आहेत. 

‘पंजाब केसरी’च्या वृत्तानुसार, या टेम्पोचालकाचे नाव सरबजीत सिंह आहे. दिल्लीतील मुखर्जीनगर येथे ही घटना घडली. जखमीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्याला लाच मागितली होती. त्याने देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी सरबजीतसोबत त्याचा अल्पवयीन मुलगादेखील होता. मुख्य रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने या घटनेचा व्हिडियो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.

मूळ बातमी येथे वाचा – पंजाब केसरीअर्काइव्ह

व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडियोसंबंधी त्यांची बाजू मांडली की, सरबजीत सिंह याच्या टेम्पोने पोलिसांच्या गाडीला धडक दिली होती. त्यानंतर वाद घालत त्याने आधी पोलिसांवर कृपाणद्वारे हल्ला केला. बचाव करण्यासाठी पोलिसांना त्याच्यावर कारवाई करावी लागली.  या प्रकरणी पोलिस आणि सरबजीत सिंह दोघांनी एकमेकांविरोधात एफआयआर दाखल केली. जखमी पोलिस कॉन्स्टेबल मुकेश यांच्या तक्रारीवरून सरबजीत व त्याच्या मुलावर कलम 186, 353 आणि 332/34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दिल्ली पोलिसांवर एखाद्या व्यक्तीला असे भररस्त्यात मारण्यावरून प्रचंड टीका झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा निःपक्ष तपास करून दोषी पोलिसांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली होती. शीख समुदायातूनदेखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजकीय वातावरण तापल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन पोलिसांना निलंबित केले होते. इंडिया टुडेच्या एका वाहिनीला सरबजीत सिंह यांनी या सर्व घटनेचा तपशील सांगितला होता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले जखमी शीख व्यक्तीचे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत. टेम्पोचालक आणि पोलिसांमधील वादातून सरबजीत सिंह नावाच्या या व्यक्तीला मारहाण झाली होती. सीएए आंदोलनाशी या घटनेचा काही संबंध नाही. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा खोटा आहे.

Avatar

Title:जखमी शीख टेम्पो चालकाचे जुने फोटो दिल्ली दंगलीचे फोटो म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •