
टीव्ही पत्रकार बातमी देत असताना व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, युक्रेनमधील लोक युद्धात मृत्यू झाल्याचे नाटक करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकार बातमी देत असताना पाठीमागे काळ्या कपड्याखाली झाकलेल्या शवांपैकी एक जण अंगावरील कपडा दूर करतो. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ युक्रेनमधील नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
जर्मन भाषेतील बातमीचा व्हिडिओ शेअर करून पोस्टकर्त्याने उपरोधाने म्हटले, की बॉम्बहल्ल्यात निष्पाप नागरिकांचे कसे नाहक मृत्यू झाले, याची बातमी देत असताना, एका मुडद्याने आपली चादर नीट केली तो अदभूत क्षण.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सदरील पत्रकार काय बोलतोय हे पाहुया. फेसबुकवरील सबटायटल सुरू केल्यावर कळाले की, ही हवामानविषयक आंदोलनाविषयीची बातमी आहे. तसेच व्हिडिओमध्ये पत्रकार ऑस्ट्रियामधील हवामानासंबंधी कायद्याबद्दल बोलत आहे. यामध्ये कुठेही युक्रेन युद्धाचा उल्लेख नाही.
(English Transcript: Said at the European level, the goals are not far from…they are not enough on the Austrian level either…Even though it is considered that the Federal Council has decided that both the renewable expansion law and the Eco-social Tax will come in short to explain that the new expansion law should be made, that is the climate neutrality Austria should be in.)
व्हिडिओमध्ये Wien: Demo Gegen Klimpapolitik असे लिहिलेले आहे. इंग्रजीमध्ये याचे भाषांतर Vienna: Demo against climate policy असे होते.
हा धागा पकडून मूळ व्हिडिओ शोधला. युट्यूबवर OE24 नावाच्या वृत्तवाहिनीने 4 फेब्रुवारी 2022 रोजी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
OE24 च्या बातमीनुसार, ऑस्ट्रियामधील हवामान बदलाविषयक धोरण आणि कायद्याविरोधात तेथील काही संघटनांनी ‘शव आंदोलन’ केले. पर्यावरणाविषयी अधिक सजग धोरण स्वीकारले नाही तर लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, याकडे लक्ष देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चौकात शवासारखे पडून अनोखे आंदोलन केले होते.
फ्रायडे फॉर फ्युचर नामक संघटनेने हे आंदोलन आयोजित केले होते. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी माहिती दिलेली आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते, की हा व्हिडिओ युक्रेनमधील नाही. ऑस्ट्रिया देशात सुरू असलेल्या हवामान बदलाविषयी जागरूकता आणि धोरणांचा विरोध करण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेयर केला जात आहे.

Title:युक्रेनमधील लोक मरण्याचे नाटक करत नव्हते; हा व्हिडिओ ऑस्ट्रियामधील आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)